कृषीवार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*ड्रोनचा वापर करुन शेतीचे अचूक व्यवस्थापन करणे शक्य – प्रकल्प सहसमन्वयक डॉ. एम.जी. शिंदे*

शेअर करा

राहुरी दि.13/टीम सीएम न्यू्ज नेेेटवर्क
आज कृषि क्षेत्रात नवनविन तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने होत असून यामुळे खर्चात बचत होऊन उत्पन्नात वाढ होत आहे. हवामान अद्ययावत शेती आणि जलव्यवस्थापन प्रकल्पांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाविषयी विविध प्रशिक्षणाचे आयोजन वेळोवेळी केले जात असून कृषि क्षेत्रात या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराविषयी माहिती प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दिली जात आहे. यामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा कृषि क्षेत्रात अधिकाधिक वापर करुन शेतीचे अचूक व्यवस्थापन या तंत्रज्ञानाच्या अवलंबनाने करता येते असे प्रतिपादन हवामान अद्ययावत शेती आणि जल व्यवस्थापन प्रकल्पाचे प्रकल्प सहसमन्वयक डॉ. एम. जी. शिंदे यांनी केले.
जागतिक बँक अर्थसहाय्यित, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे हवामान अद्ययावत शेती आणि जल व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर या विषयी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केंद्राच्या सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी असाप अॅग्रीटेक नाशिकचे श्री. अजीत खर्जुल, प्रकल्प समन्वयक डॉ. सुनिल गोरंटीवार, प्रशिक्षण आयोजक सचिव डॉ. सचिन नलावडे, कार्यक्रम समन्वयक इंजि. योगेश दिघे उपस्थित होते.
यावेळी डॉ. सचिन नलावडे यांनी उपस्थितांचे परिचय करुन देतांना प्रशिक्षणाची पार्श्वभूमी विषद करुन ड्रोन तंत्रज्ञानाविषयी मुलभूत माहिती दिली. श्री. अजीत खर्जुल यांनी ड्रोनच्या वेगवेगळ्या भागांची जोडणी करुन ड्रोन बनविण्याचे प्रात्यक्षिक व ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक सादर करुन माहिती दिली. कार्यक्रम समन्वयक इंजि. योगेश दिघे यांनी ड्रोन तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या प्रकाराविषयी माहिती देऊन अपेक्षीत उत्पादनाचा अंदाज, नैसर्गिक आपत्तीपासून होणारे नुकसान, क्षेत्र मोजणी, पिकांवरील रोगांचे पुर्वानुमान आदी विविध कारणांकरीता कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करता येईल अशी माहिती दिली.
या प्रशिक्षणात कोईम्बतूर येथील तामिळनाडू कृषि विद्यापीठातील तीन प्राध्यापक व महात्मा फुले कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी तसेच प्राध्यापक वर्ग असे एकुण 30 प्रशिक्षणार्थी यात सहभागी झाले होते. प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन नलावडे यांनी केले तर आभार इंजि. योगेश दिघे यांनी मानले. या प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी हवामान अद्ययावत शेती आणि जल व्यवस्थापन प्रकल्पाचे संशोधन सहयोगी डॉ. गिरीषकुमार भणगे व डॉ. चैतन्य पांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close