ताज्या घडामोडीप.महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रराजकीय

*पंकजा मुंडे यांचे औरंगाबादेत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू*

शेअर करा

औरंगाबाद /cmnews

मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे, जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवावी, सिंचन अनुशेष व पाण्याची तुट भरून काढावी आदी मागण्यांसह अन्य समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिदषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रावसाहेब दानवे, हरिभाऊ बागडे यांच्यासह मराठवाड्यातील खासदार, आमदार उपोषणात सहभागी झाले आहेत.

मराठवाडयाच्या पाणी प्रश्नांवर लाक्षणिक उपोषण करण्याची घोषणा पंकजाताई मुंडे यांनी १२ डिसेंबर २०१९ रोजी गोपीनाथ गडावरून केली होती, त्यानुसार सकाळी १०.३० वा. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर या उपोषणाला सुरवात झाली. उपोषणात सहभागी होण्यासाठी मराठवाड्याच्या काना-कोप-यातून भाजपचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सकाळ पासूनच आयुक्त कार्यालयासमोर जमा झाले होते. उपोषणाला बसण्यापूर्वी पंकजाताई मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, पंडित दीनदयाळ उपाध्याय, डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. ‘पंकजाताई मुंडे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘कोण आली रे कोण आली, महाराष्ट्राची वाघिण आली ‘ या घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता.

या मागण्यांसाठी उपोषण

मराठवाड्याला हक्काचे पाणी द्यावे व या भागातील शेतकरी व सर्व सामान्य माणसाला दुष्काळाच्या जोखडातून बाहेर काढावे, जलयुक्त शिवार योजना सुधारणांसह (असल्यास ) पुन्हा प्रभावीपणे व जलदगतीने राबविण्यात यावी, महत्वाकांक्षी अशी मराठवाडा वाॅटरग्रीड प्रकल्प योजना तातडीने सुरू करून अकरा धरणे एकमेकांना लूप पध्दतीने जोडावे, जायकवाडीत उपलब्ध होणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी समांतर प्रवाही कालव्याद्वारे सिंधफणा, वाण उप खो-यांना सोडावे,मराठवाड्याचा सिंचन अनुशेष व पाण्याची तुट भरून काढावी तसेच गेल्या काही वर्षापासून या भागाला देय असलेले अनुशेष अनुदान तातडीने द्यावे,बीड जिल्हयाच्या आरक्षित पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा, मराठवाड्यातील कायम दुष्काळी भागासाठी महत्वाकांक्षी असलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला अधिकचा निधी देऊन प्रकल्प कालमर्यादित गतीने पूर्ण करावा, मराठवाडयासाठी महत्वपूर्ण अशा तापी-गोदावरी नदीजोड प्रकल्प (प्राणहित योजना) मंजूर करावी, औरंगाबाद शहरासाठी सर्वात मोठी पाणी पुरवठा करणारी पाईप लाईनची १६८० कोटीची योजना त्वरित अंमलात आणावी, मराठवाड्यात कॅबिनेटची बैठक घ्यावी, जेणेकरून मराठवाड्यातील प्रश्नांची उकल जलदगतीने होईल आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

पाण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं, काळाची गरज

मराठवाड्याचा उत्कर्ष हा सर्वस्वी पाण्यावर अवलंबून आहे. मराठवाड्याला जलसंपदा, जलसंधारणाच्या माध्यमातून पुरेसं पाणी मिळायलं हवं. यातून शेती चांगली होईल आणि शेतकऱ्याला दिलासा मिळेल. दुसरीकडे मुलांचं शिक्षण, पोषण रोजगार मिळायला हवं. मात्र मराठवाड्यात सर्वात कळीचा मुद्दा पाणी हा आहे. मराठवाड्यात पाणी आलं तर येथील स्थलांतरही थांबवता येईल, असं पंकजाताई मुंडे यांनी उपोषणापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले. विविध राजकीय पक्षांनी, स्वयंसेवी संस्थानी आणि मान्यवरांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून मराठवाड्याला दुष्काळाच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी व वाळवंट होण्यापासून वाचवण्यासाठी राजकीय पक्ष, माध्यमं आणि सेवाभावी संस्था यांची मोटं बांधणे आवश्यक आहे. कर्जमाफी हा एक उपाय आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पण कायमस्वरुपी मराठवाड्याच्या जनतेला स्वावलंबी बनवण्यासाठी शेतीला पाणी असणे आवश्यक आहे.

या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, खासदार डाॅ प्रितमताई मुंडे, आ. सुजितसिंह ठाकूर, आ. संतोष दानवे, आ. तानाजी मुटकुळे, आ. मेघना बोर्डीकर, आ. नारायण कुचे, आ. अभिमन्यू पवार, आ. लक्ष्मण पवार, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, केशवराव आंधळे, रामराव वडकुते, भागवत कराड, रमेश कराड, रमेश आडसकर, ज्ञानोबा मुंडे, लातूर जि. प. अध्यक्ष राहूल केंद्रे, रमेश पोकळे आदींसह मराठवाड्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, विविध सामाजिक संस्था, स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close