चप्पल विसरली आणि बिबट्याने बळी घेतला;बिबट्याचा आष्टी तालुक्यात तिसरा बळी
चप्पल विसरली आणि बिबट्याने बळी घेतला;बिबट्याचा आष्टी तालुक्यात तिसरा बळी

आष्टी दि 29 ,प्रतिनिधी
आष्टी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथे सकाळी बिबट्याने एका महिलेवर हल्ला केल्यानंतर सायंकाळी पुन्हा दुसऱ्या महिलेवर हल्ला करून  बळी घेतल्याची घटना सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली .सुरेखा निळकंठ बळे असे या महिलेचे नाव आहे. ती शेतातून घरी परतत असताना हा हल्ला झाला .

मिळालेल्या माहितीनुसार सुरेखा बळे ह्या कापूस वेचण्यासाठी शेतात गेल्या होत्या.सायंकाळी वेळ झाल्यानंतर त्या परत येत असताना आपल्या चप्पल विसरल्या.परत चप्पल आणण्यासाठी त्या माघारी गेल्या असता बिबट्याच्या तावडीत सापडल्या .बिबट्याने त्यांच्या नरडीचा घोट घेतला.

पत्नी घरी का येत नाही म्हणून पाहण्यासाठी गेलेले निळकंठ बळे यांनी पत्नीचा मृतदेह पाहिल्यानंतर बेशुद्ध झाले. आष्टी तालुक्यात बिबट्याचे सातत्याने हल्ले होत आहेत.

सुरुडी येथे पहिला मृत्यू झाला त्यानंतर किन्ही येथे दुसरा मृत्यू झाला.आणि आता तिसरा मृत्यू …आणखी किती किती बळी हा बिबट्या घेणार असा सवाल आहे.

सकाळी शालन भोसले या महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते.त्यानिमित्ताने वन विभागाने या ठिकाणी गस्त सुरू केली होती .मात्र बिबट्याने गुंगारा देऊन दुसऱ्या महिलेला आपले भक्ष्य केले.

हेही वाचा :पुन्हा एकदा महिलेवर हल्ला

Share this story