ताज्या घडामोडीप.महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रराजकीयविदर्भव्यापार

महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीवरील संशोधन केंद्र उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शेअर करा
मुख्यमंत्र्यांनी घेतला पर्यटन विकासाचा आढावा 
सातारा : महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरी आणि जंगलातील फळे, मध यासाठी प्रसिद्ध आहे मात्र या फळांवर याठिकाणी अधिक संशोधन करण्याची गरज आहे. राज्यात आणि देशातही महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची लागवड झाली पाहिजे यासाठी एक संशोधन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कृषी विभागाला दिल्या. राजभवन येथील बैठक कक्षात महाबळेश्वर पर्यटन विकास बैठकीत ते बोलत होते.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, उत्तम संशोधन झाल्यास स्ट्रॉबेरीचा दर्जा व उत्पादन वाढेल तसेच राज्यातील इतर अनुकूल भागांतही स्ट्रॉबेरी पीक घेता येऊ शकेल यावर भर दिला पाहिजे. महाबळेश्वर एक लोकप्रिय ठिकाण असल्याने याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. साहजिकच वाहनांची समस्या आहे. यासाठी महाबळेश्वरच्या बाहेरील भागात मोठे वाहनतळ करून बॅटरी किंवा इलेक्ट्रिक संचलित वाहनांचा उपयोग करता येईल का, हे पाहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
महाबळेश्वरप्रमाणे परिसरातील पर्यटन स्थळांचा देखील विकास होणे, ती लोकप्रिय होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. येथील पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी कालबद्ध रीतीने मंत्रालयातून मान्यता देण्यात येतील असेही ते म्हणाले.
याप्रसंगी बोलताना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, उत्तम दर्जाचे स्ट्रॉबेरी क्रीम उत्पादित करून त्याला बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न व्हायला हवेत. महाबळेश्वर येथे भारतातूनच नव्हे तर इतर देशातूनही पर्यटक येतात. याठिकाणी बहुभाषिक पोलीस आणि मार्गदर्शक असल्यास विविध भाषिक पर्यटकांना त्याचा फायदा होईल.
या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंग, कोल्हापूर वन परिक्षेत्राचे मुख्य वन संरक्षक डॉ.बेन क्लेमंट, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close