आरोग्यताज्या घडामोडी

मातृवंदना सप्ताहाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात दुसरा

शेअर करा

नवी दिल्ली : ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत’ आयोजित ‘मातृवंदना सप्ताहाच्या’ उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी आज केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने येथील हॉटेल अशोकमध्ये आयोजित कार्यक्रमात मंत्रालयाच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीसह मातृवंदना सप्ताहाची उत्कृष्ट अंमलबजावणी  करणाऱ्या राज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत २ ते ८ डिसेंबर २०१९ दरम्यान देशभर ‘मातृवंदना सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले. या सप्ताहाची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांना यावेळी छोटे व मोठे राज्य अशा दोन श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. मोठ्या राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकाविला असून पुणे स्थित राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाचे सहायक संचालक डॉ.अनिरुद्ध देशपांडे आणि सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ.देशपांडे यांनी  राज्यात राबविण्यात आलेल्या मातृवंदना सप्ताहाबाबत महाराष्ट्र परिचय केंद्राला माहिती दिली. ते म्हणाले, राज्यात नोव्हेंबर २०१७ मध्ये  प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी सुरु झाली असून आतापर्यंत १४ लाख ७० हजार ४१६ लाभार्थ्यांना एकूण ५७८ कोटी ८५ लाख ४१ हजार कोटींचा निधी वितरीत करण्यात आला. मागील वर्षी २ ते ८ डिसेंबर दरम्यान केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने  प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबाबत जनजागृती व लाभार्थ्यांना प्रत्यक्षात लाभ पोहोचविण्यासाठी देशभर ‘मातृवंदना सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले. विहीत कालावधी दरम्यान राज्यात गाव, तालुका व जिल्हा पातळीवर या सप्ताहाचे आयोजन  करण्यात आले.

लाभार्थ्यांना या सप्ताहात समाविष्ट करून घेण्यासाठी प्रसार माध्यमे, सोशल मीडिया, आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांच्या मार्फत जनजागृती करण्यात आली. सप्ताहादरम्यान रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, गर्भवतीमातांना पौष्टिक आहाराबाबत माहिती देण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत नव्या लाभार्थ्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी  शिबीरे आयोजित करण्यात आली. काही कारणाने लाभार्थी सुटून गेले असल्यास त्यांना या योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी घरोघरी जात तसेच दूरचित्रवाणी वाहिन्या, नभोवाणीहून जिंगल्स व रेडिओ स्पॉटच्या माध्यमातून तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमातून  मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यकम या सप्ताहादरम्यान राबविण्यात आले.

देशभर मातृवंदना सप्ताहादरम्यान राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांची संपूर्ण माहिती केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वेबपोर्टलवर अपलोड करण्यात आली. या माहितीचे परिक्षण करून आणि प्रत्यक्ष पाहणी करून अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे डॉ.देशपांडे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत प्रथम प्रसव होणाऱ्या महिलांना पौष्टिक आहार मिळावा, मोल मजुरी करणाऱ्या महिलांना कामानिमित्त बाहेर जाताना आराम मिळावा, बाळाची  निगा घेता यावी यासाठी तीन हप्त्यांमध्ये एकूण ५ हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेकरिता केंद्राकडून ६० टक्के तर राज्याकडून ४० टक्के निधी पुरविण्यात येतो.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close