आधुनिक श्रावनबाळाने आई वडिलांची घडवली हेलिकॉप्टर सफर
आधुनिक श्रावनबाळाने आई वडिलांची घडवली हेलिकॉप्टर सफर

पनवेल

लग्न झालं, मुलं झाली, पण आई वडिलांची 'ती' इच्छा कशी पूर्ण करावी? 
अखेर स्वत:च्या वाढदिवशी आई वडिलांना सरप्राईज म्हणून हेलिकॉप्टरने फिरवण्याची कल्पना मुलाला सुचली.


  रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील आजवली येथे  गवंडीकाम करणाऱ्या वसंत मगर यांच्या मुलाने चक्क आई वडिलांना  हेलिकॉप्टर ची सफर घडवली आहे.

 पनवेल मधील आजवली गावात राहणारे वसंत मगर आणि उषा मगर गेल्या अनेक वर्षापासून गवंडी काम करतात. गरीब परिस्थितीत जन्माला आलेल्या उमेश मगर याने  आईवडीलांचे आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. 

ज्या आई-वडिलांनी मुलांना  गवंडीकाम वाढवलं, शिक्षण दिलं, मोठं केलं  त्या आई वडिलांना  वाढदिवशी मुलानं सरप्राईज म्हणून चक्क हेलिकॉप्टरची राईड गिफ्ट केली.  

मगर कुटुंब मूळचे जालना जिल्ह्यातील  शिरपूर या गावचे आहे. गावाकडे हाताला काम नसल्याने त्यांनी शहराचा रस्ता धरला होता. गेल्या २५ वर्षापासून उमेश याचे वडील वसंत मगर आणि आई उषा मगर गवंडी काम करतात. 
 आपल्या नशिबात पाचविला पुजलेली गरिबी असल्याने दाम्पत्याने कष्ट करून मुलाला चांगले शिक्षण दिले. उमेश याने कंम्प्युटर हार्डवेअर डिप्लोमा केल्यानंतर वाशीतील मॉलमध्ये नोकरी मिळवली. मात्र काही कारणास्तव नोकरी सोडावी लागली. त्यानंतर उमेशने स्वत:चा व्यवसाय करण्याचा निर्णय घेत शेअर मार्केटचे शिक्षण घेतले. सध्या उमेश आणि त्याची पत्नी अनिता मगर दोघेही शेअर मार्केटमध्ये काम करीत असून स्वत:च्या दोन कंपन्या सुरू केल्या आहेत.

एक वर्षांपूर्वी घरात टिव्हीवर फिल्म बघत असताना हेलिकॅप्टर दृश्य पाहिले. ते पाहिल्यानंतर आपल्याला पण हेलिकॉप्टरमध्ये येईल का ? अशी  इच्छा उमेशच्या आईने व्यक्त केली होती. 

आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट  केलेल्या आईवडिलांची  इच्छा पूर्ण करण्यासाठी उमेशने हेलिकॅप्टर राईडचे प्लॅनिंग सुरू केले. 

 हेलिकॅप्टरमध्ये बसून आईवडिलांची मुंबईत राईड करता आली असती. पण थेट हेलिकॅप्टर उतरवायचे तर आपल्या गावातच असे उमेशने ठरवले. 
 
यासाठी गेल्या सहा महिन्यापासून त्याने माहिती काढणे, कोणत्या कंपनीचे हेलिकॅप्टर मिळेल, ते बुक करणे, मुंबई ते पनवेल प्रवास होईल का?, आजवली गावात उतरेल का? , स्थानिक प्रशासन , रायगड जिल्हाधीकारी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय सर्वांच्या परवानग्या, गावातील शाळेतील मैदानावर हेलिपॅड तयार करणे या सर्व कामासाठी तो गेली सहा महिने काम करीत होता. यासाठी त्याला पाच लाख रुपये खर्च आला.

अखेर परवानगी मिळाल्यानंतर उमेशने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवसादिवशी मुंबई ते पनवेल असा आईवडिलांसह हेलिकॅप्टर मधून प्रवास केला.

 यावेळी त्याची  पत्नी आणि लहान मुलगीही उपस्थित होती.  यावेळी उंच आकाशातून येताना वसंत मगर आणि उषा मगर यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. 
 
मुलाने आपल्यासाठी हेलिकॅप्टर बुक करून आपल्याला थेट गावात आणले यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. गावच्या मैदानावर हेलिकॅप्टर उतरल्या नंतर वाजत गाजत आईवडीलांना स्टेजवर घेवून जाण्यात आले. गावकरी आपल्याकडे  आपुलकीच्या नजरेने बघत असल्याने  उमेशच्या आईवडिलांना सर्व काही स्वप्नवत वाटत होते. त्यामुळे आईवडीलांना कावड घेऊन काशीला नेता आले नसले तरी  या आधुनिक श्रावण बाळाने त्यांना हेलिकॅप्टरमधून आकाश प्रदक्षिणा घालून आणल्याची भावना येथील सर्व गावकऱ्यांमध्ये होती.

Share this story