सातार्यामध्ये जानेवारीत होणार्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या नावाची निवड झाली आहे.
अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार विश्वास पाटील ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्याही नावाची चर्चा होती.
नेमाडे यांनी यापूर्वीच नकार दिला असल्याने विश्वास पाटील यांचे नाव अंतिम होणार असल्याची जोरदार चर्चा होती. आजच्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत ‘पानिपत’कारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
साताऱ्यामध्ये होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठी पुण्यातील साहित्य परिषदेत आज सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती.
साहित्य महामंडळाच्या वेगवेगळ्या शाखांकडून वेगवेगळ्या साहित्यिकांची नावे अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आली होती. ज्यामध्ये रंगनाथ पठारे, विश्वास पाटील , बाळ फोंडके यांची नावे आघाडीवर होती.
साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलींद जोशी यांनी काही दिवसांपुर्वी भालचंद्र नेमाडे यांची देखील भेट घेऊन त्यांना अध्यक्षपदासाठी गळ घातली होती. मात्र नेमाडेंकडून प्रतिसाद मिळाला नाही. आजच्या बैठकीमध्ये विश्वास पाटील यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध व लोकप्रिय कादंबरीकार
विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध व लोकप्रिय कादंबरीकार आहेत. त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय विषयांवर आधारित अनेक प्रभावी कादंबऱ्या लिहिल्या आहेत. ‘पानिपत’ ही त्यांची सर्वाधिक गाजलेली ऐतिहासिक कादंबरी असून तिच्यातून त्यांनी आपल्या संपादकीय शैलीची एक आगळीवेगळी छाप मराठी वाचकांवर टाकली आहे