अहिल्यानगर,
सार्वजनिक – खासगी भागीदारीद्वारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या अद्यावतीकरण धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. या धोरणासाठी उद्योजकांनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योजक व संस्था व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी संवाद साधण्यासाठी, त्यांच्या गरजा जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी आमदार विक्रम पाचपुते, माजी आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कारांची घोषणा
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, उद्योजक व शासन यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. राज्यातील उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येत असून, राज्यातील सर्व आयटीआयच्या सक्षमीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. उद्योगाच्या मागणीनुसार सक्षम उद्योग सहकार्याद्वारे प्रशिक्षणार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, सार्वजनिक-खाजगी भागीदारी धोरण हे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील व्यावसायिक शिक्षणाचे आधुनिकीकरण करण्यासाठी, कौशल्यातील अंतर कमी करण्यासाठी व उद्योजकांच्या गरजेशी सुसंगत कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी एक परिवर्तनकारी उपक्रम आहे. तरुण पिढीची कौशल्यवृद्धी झाल्यास त्यांच्याही हाताला काम मिळेल. या कौशल्य विकासासाठीच आयटीआयमध्ये नवनवीन अभ्यासक्रमांसोबतच अल्पकालीन अभ्यासक्रमही सुरू करण्यात येत आहेत. राज्यात कौशल्यावर आधारित मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध असून, तरुणांना प्रशिक्षित करून रोजगार देण्याचे कार्य सर्वांनी मिळून करावे, असे आवाहनही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी केले.
या इंडस्ट्रियल मिटमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उद्योजकांशी मोकळेपणाने संवाद साधून कुशल मनुष्यबळ विषयक त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यावर सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन दिले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार सर्वदूर पोहोचवा
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार व त्यांनी मांडलेला वैचारिक सिद्धांत नव्या पिढीला समजावा, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सव समितीच्या माध्यमातून त्यांचे विचार सर्वदूर पोहोचवावेत, अशी अपेक्षा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत व्यक्त केली.
समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचणे हाच खरा राष्ट्रधर्म आहे. समाजातील तळागाळातील व्यक्तीला स्वावलंबी बनवणे, त्याच्या गरजा पूर्ण करणे, हा त्यांच्या विकासदृष्टीकोनाचा केंद्रबिंदू होता. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार सर्व शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.