नाशिक
Nashik robotics studio news नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील जिल्हा परिषदेच्या दाभाडी शाळेत कार्यान्वित केलेल्या रोबोटिक्स ॲण्ड एआय स्टुडिओमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळणार आहे. प्रत्येक तालुकास्तरावर अशा प्रकारची लॅब कार्यान्वित करून नाशिक जिल्हा परिषदेने राबविलेला सुपर 50 उपक्रम राज्यात राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
जिल्हा परिषद, नाशिक, शिक्षण विभाग, मालेगाव आणि ग्रामपालिका दाभाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी जिल्हा परिषदेच्या शाळेत रोबोटिक्स आणि एआय मेकर स्टुडिओचे उद्घाटन मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सरपंच प्रमोद निकम, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, गट शिक्षणाधिकारी नीलेश पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. भुसे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा असते. अशा लॅबमुळे विद्यार्थी संशोधनाकडे वळू शकतील. त्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला कृतिशीलतेची जोड मिळणार आहे.
राज्यात सुपर 50 उपक्रम राबविण्याबरोबरच क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित करण्याची संधी देण्यात येईल. या लॅबच्या पाहणीसाठी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी भेट देतील. त्यामुळे दाभाडी ग्रामपंचायतीवरील जबाबदारी वाढली आहे, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
श्रीमती मित्तल म्हणाल्या की, राज्य शासनाने 2047 मध्ये विकसित महाराष्ट्राचे लक्ष्य निश्चित केले आहे. शालेय शिक्षण मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेली ही लॅब उपयुक्त ठरणार आहे.
जिल्ह्यात 13 लॅब आहेत. या लॅबमध्ये 9 प्रकारची दालने आहेत. विशेष करून यात भविष्याचे नियोजन लक्षात घेऊन एआय बद्दल माहिती देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विविध विषय सोडविण्यासाठी या लॅबचा उपयुक्त ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.