Saturday, September 6, 2025
HomeUncategorizedमहाराष्ट्रातील सहा शिक्षक ' राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025' ने सन्मानित

महाराष्ट्रातील सहा शिक्षक ‘ राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025’ ने सन्मानित

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण*

शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल’ – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नवी दिल्ली, 5

national teacher’s day 2025 rashtrapti शिक्षक दिनानिमित्त विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सहा शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यामध्ये शालेय शिक्षण क्षेत्रातील डॉ. शेख मोहम्मद वक़िउद्दीन शेख हमीदोद्दीन (जिल्हा परिषद हायस्कूल, अर्धापूर, नांदेड), सोनिया विकास कपूर (एटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल नं. 2, मुंबई) आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील डॉ. संदीपन गुरुनाथ जगदाळे (दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स, लातूर), डॉ. नीलाक्षी जैन (शाह अँन्ड अँकर कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई), प्रा. पुरुषोत्तम पवार (एस व्ही पी एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनीअरिंग, बारामती), आणि कौशल्य विकास क्षेत्रातील श्री. अनिल रामदास जिभकाटे (संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर) यांचा समावेश आहे.

शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे आयोजित या सोहळ्यात 45 शालेय शिक्षक, 21 उच्च शिक्षण आणि 16 कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजूमदार, जयंत चौधरी, शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे (MSDE) सचिव देबाश्री मुखर्जी यावेळी उपस्थित होते.

या पुरस्काराचा उद्देश शिक्षकांचे समर्पण, नाविन्यपूर्ण कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करणे हा आहे. मागील काही वर्षांपासून या पुरस्काराची व्याप्ती वाढवून उच्च शिक्षण तसेच कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातील शिक्षकांनाही संधी देण्यात येत आहे.

शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल’ – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
या समारंभात मार्गदर्शन करताना राष्ट्रपतींनी ‘आचार्य देवो भव’ या उक्तीचा उल्लेख करत शिक्षकांचे समाजातील सर्वोच्च स्थान अधोरेखित केले. “शिक्षक मुलांमध्ये आत्मसन्मान आणि सुरक्षितता जागवतात. त्यांचे यश हेच शिक्षकांचे खरे बक्षीस आहे,” असे त्या म्हणाल्या. राष्ट्रीय शिक्षा धोरण 2020 च्या अंमलबजावणीत शिक्षणाला आनंददायी बनवण्यावर भर देताना त्यांनी बालिका शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी STEM क्षेत्रातील मुलींच्या 43% नोंदणीबद्दल समाधान व्यक्त केले. “भारताला कौशल्याची राजधानी आणि सुपर पॉवर बनवण्यात शिक्षकांची भूमिका निर्णायक आहे,” असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते शिक्षक:

डॉ. शेख मोहम्मद वक़िउद्दीन शेख हमीदोद्दीन (जिल्हा परिषद हायस्कूल, अर्धापूर, नांदेड):
28 वर्षांपासून विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. शेख यांनी ग्रामीण भागातील अल्पसंख्याक मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. ‘सुरक्षित शिक्षण तुमच्या दारी’ या उपक्रमातून त्यांनी गावापासून दूर भाड्याच्या जागेत शाळा सुरू करून मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. घरोघरी जाऊन पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि मुलींसाठी मोफत सॅनिटरी पॅड वाटप सुरू केले. बालभारतीच्या सहावी ते बारावीच्या पुस्तकांसाठी लेखन केले असून त्यांना यापूर्वी राज्य पुरस्कारही मिळाला आहे.

सोनिया विकास कपूर (एटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल नं. 2, मुंबई):
मुख्याध्यापिका सोनिया कपूर यांनी कमी खर्चातील शिक्षण साहित्याची निर्मिती करून सहकारी शिक्षकांना प्रशिक्षण दिले. ‘टीच टू एनरिच’ या पुस्तकाच्या लेखिका असलेल्या कपूर यांनी समूह आधारित शिक्षण आणि आयसीटीचा वापर शिक्षणात प्रोत्साहित केला. गेल्या 23 वर्षांत विद्यार्थ्यांच्या जीवनकौशल्ये आणि मूल्ये दृढ करण्यावर त्यांनी भर दिला.

डॉ. संदीपन गुरुनाथ जगदाळे (दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स, लातूर):
संगीत विषयाचे प्राध्यापक असलेले डॉ. जगदाळे हे लातूरमधील पहिले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते ठरले. तबलावादक आणि गायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्यांनी गोंड आदिवासी वस्त्यांवर शिक्षण पोहोचवले, एचआयव्ही बाधित व अनाथ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील संगीत पुस्तक तयार करणे हे त्यांचे विशेष योगदान आहे. कोविड काळात दूरदर्शन, रेडिओ आणि सोशल मीडियाद्वारे त्यांनी लोकगीते व पोवाड्यांच्या माध्यमातून जनजागृती केली. त्यांच्या लिखाणातील 13 संगीतग्रंथ परदेशातही प्रसिद्ध झाले आहेत.

डॉ. नीलाक्षी जैन (शाह अँन्ड अँकर कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई):
अभियांत्रिकी शिक्षणातील नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि संशोधनासाठी डॉ. जैन यांचा सन्मान झाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये यश मिळवले. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक ज्ञानच दिले नाही तर सर्जनशीलता आणि संशोधनाची गोडी लावली.

प्रा. पुरुषोत्तम पवार (एस व्ही पी एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनीअरिंग, बारामती):
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाविषयी जागरूकता आणि कौशल्य विकास घडवून आणण्यासाठी प्रा. पवार यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी उद्योजकतेला प्रोत्साहन देत स्थानिक समुदायालाही शिक्षणाशी जोडले.

श्री. अनिल रामदास जिभकाटे (संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर):
नवीन पिढीला व्यावसायिक कौशल्य आणि शिक्षणाद्वारे सक्षम करण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय प्रयत्न केले. त्यांनी नागपूरच्या वर्किंग कार्यशाळांपासून आपली यात्रा सुरू केली, जिथे त्यांनी 700 हून अधिक शिक्षण सत्रांचे आयोजन केले आणि 14 पेक्षा जास्त पात्रता (क्वालिफिकेशन्स) मध्ये सहभाग घेतला. त्यांच्या या योगदानामुळे शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे.

या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांना प्रमाणपत्र, रौप्य पदक आणि 50 हजार रुपयांचे रोख बक्षीस प्रदान केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments