छत्रपती संभाजीनगर :-
chhatrapati sambhajinagar muncipal elections shivsena ubt भाजपाने आपले मूळ विचार आणि वेगळेपण गमावले असून आज ‘राष्ट्रप्रथम’ ऐवजी ‘भ्रष्टाचार प्रथम, बलात्कारी प्रथम आणि खुनी प्रथम’ अशी त्यांची ओळख बनली आहे, असा जोरदार हल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे प्रचारसभेत केला. निष्ठावंतांचे हाल सुरू असून बाहेरून आलेल्यांना अंघोळ घालण्याची वेळ या सरकारवर आली आहे अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. पैशांच्या जोरावर निवडणुका वाकवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला की, अस्तित्वाची लढाई आता जनतेची होणार आहे. ट्रिपल इंजिन सरकारच्या जाहिरातींवर टीका करत ते म्हणाले, लाज वाटावी अशी ही दिखाऊ मोहिम आहे. ही विकासाची गती नसून विनाशाची गती आहे अशी टीका त्यांनी केली.
शहरासाठी जाहीर केलेल्या योजना सरकारने पूर्ण केल्या नसल्याचा आरोप करत ठाकरे म्हणाले की, बाळासाहेबांच्या आवडत्या शहरात लोकसभा आणि विधानसभा जिंकता आली नाही याचे शल्य मला आहे. मात्र आता महानगरपालिका जिंकून दाखवण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही तुमचा शब्द पाळा, आम्ही आमचा शब्द नक्की पाळू असे भावनिक आवाहन त्यांनी मतदारांना केले.
शहराच्या नामांतरावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले संभाजीनगर हे नाव मीच शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केले. बाळासाहेबांचे स्वप्न आम्ही पूर्ण केले. तुम्ही ‘छत्रपती’ जोडले हे चांगलेच; पण आमच्याशिवाय ते शक्य नव्हते. भाजपमध्ये ती हिंमत नव्हती. यावेळी त्यांनी भाजपला थेट आव्हान देत, अहमदाबादचे नामांतर कर्णावती करून दाखवा, तो गृहमंत्री अमित शहा यांचा मतदारसंघ आहे.
छत्रपती संभाजीनगर शहराच्या भीषण पाणीटंचाईसाठी ठाकरे यांनी भाजप सरकारला जबाबदार धरले. मी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली कामे अजून पूर्ण केली नाहीत. महानगरपालिकेकडे पैसे नसल्याने मी सरकारकडून निधी मंजूर करून दिला होता. दोनदा पाहणी केली, पण माझे सरकार गेले आणि पुढे कामे रखडली. इथे लोक राहतात की नाही, हेही कळेनासं झालं आहे. पाणी मिळत नाही, पण दारू सहज मिळते. दारूच्या दुकानाचे परवाने सहज मिळतात. मी मुख्यमंत्री राहिलो असतो तर या भागाला केव्हाच पाणी मिळालं असतं असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय आरोपांच्या फैरीत उद्धव ठाकरे यांनी बदलापूर प्रकरणाचा उल्लेख करत भाजपवर घणाघात केला. त्या प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे स्वीकृत नगरसेवक कसा झाला ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणवणाऱ्यांकडे उमेदवारच नाहीत, याला उचल, त्याला उचल अशी अवस्था आहे असा टोला लगावला.
अजित पवार प्रकरणावरही उद्धव ठाकरे यांनी सरकारला जाब विचारला. ७० हजार कोटींच्या आरोपांचे कागद देवेंद्र फडणवीसांनी गाडीत भरून नेले होते. ते कागद खरे असतील तर अजित पवारांना सोबत घेऊ नका आणि खोटे असतील तर त्यांची जाहीर माफी मागा अशी स्पष्ट मागणी त्यांनी जाहीर सभेत केली.
पैशांच्या जोरावर निवडणूक वळवण्याचा आरोप करत ठाकरे म्हणाले, फोनपेवरून दोन-दोन हजार रुपये वाटले जात आहेत. विरोधात कोणी राहू नये म्हणून बिनविरोध निवडणुकीचे डाव खेळले जात आहेत. पैशांचा माज करू नका, गरज पडली तर आम्ही ममता बॅनर्जीसारखे रस्त्यावर उतरू.
मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, आम्ही ९२ हजार कोटींच्या एफडी केल्या होत्या. आज तीच मुंबई महापालिका कर्जात बुडवली आहे. विकास हवा, पण तो नियोजनबद्ध आणि पारदर्शक हवा; ठेकेदारांचा विकास नको.
भाजपवर हिंदू–मुस्लिम वाद पेटवण्याचा आरोप करत उद्धव ठाकरे म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत ‘बांगलादेशी घुसले’ म्हणणारे गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अपयशी ठरले आहेत. तुमचे सरकार आहे ना, मग घुसखोरी थांबवा.
उद्धव ठाकरे यांनी मतदारांना साद घालत म्हटले, बाळासाहेबांनी दिलेला शब्द कधी मोडू नका अशी शिकवण दिली. आमचा ‘वचननामा’ आहे, जाहीरनामा नाही. एक वचन तुम्ही पूर्ण करा, महापालिकेत आम्हाला निवडून द्या आम्ही तुम्हाला दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करून दाखवू. आता अस्सल भगवा पुन्हा फडकवण्याची जबाबदारी तुमची आहे.