अहिल्यानगर,
“shrigonda krida sankul ग्रामीण भागातील युवकांमध्ये खूप गुणवत्ता आहे. त्यांना योग्य संधी, सुविधा व व्यासपीठ मिळाले तर ते राज्य व देश पातळीवर चमकदार कामगिरी करू शकतात. अहील्यानगरच्या क्रीडा क्षेत्राची परंपरा सर्व खेळाडूनी आपल्या नैपुण्यातून जोपासली आहे.श्रीगोंदा येथे उभारण्यात येणारे हे क्रीडा संकुल युवकांच्या क्रीडा कौशल्यांना चालना देणारे ठरेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
श्रीगोंदा शहरातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या सर्व सुविधांनीयुक्त क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगराध्यक्षा श्रीमती सुनीता खेतमाळीस,तहसीलदार सचिन डोंगरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, मुख्याधिकारी पुष्पागंधा भगत, तालुका क्रीडा अधिकारी दिलीप दिघे आदी उपस्थित होते.
सुमारे साडे आठ कोटी रुपयांच्या माध्यमातून पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलाच्या धर्तीवर २ हेक्टर जागेवर क्रीडा विकासाची कामे या ठिकाणी करण्यात येणार आहेत. क्रीडा संकुलामध्ये मैदाने, धावपट्टी, इनडोअर क्रीडा हॉल, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, प्रेक्षक गॅलरी, बदलगृहे, प्रकाशव्यवस्था आदी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
नवीन शासकीय विश्रामगृहाची पाहणी
भूमिपूजन कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी श्रीगोंदा येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या शासकीय विश्रामगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी बांधकामाची गुणवत्ता, खोल्यांची रचना, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, पार्किंग, सभागृह आदी बाबींची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.