*जैवऊर्जा निर्मितीतुन ग्रामीण विकास शक्य – केंद्रिय मंत्री नितीन गडकरी*
*जैवऊर्जा निर्मितीतुन ग्रामीण विकास शक्य – केंद्रिय मंत्री नितीन गडकरी*

 

राहुरी विद्यापीठ दि 30 जून टीम सीएमन्यूज

भारतीय शेती हे आपल्या देशासाठी फार महत्वाची असून देशाची 85 टक्के लोकसंख्या ही शेतीशी निगडीत आहे. आपल्या देशातील नागरीकांचे दरडोई उत्पन्न फारच कमी आहे. यासाठी गरीबी व बेरोजगारी या दोन गोष्ट्री कारणीभूत असून या करीता कृषि, ग्रामीण व आदिवासी भागाचा प्रामुख्याने विकास होणे गरजेचे आहे. पीक पध्दतीत बदल करणे गरजेचे असून पर्यावरण पूरक पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकर्यांना भात, गहू, बाजरी, बांबू यासारख्या पिकांचे महत्व पटवून द्यावे लागेल जेणेकरुन जैव इंधनाबरोबरच बांबूसारख्या पिकांपासून तयार होणार्या अगरबत्ती स्टिक्स, लोणचे, कपडे, पेपर मिलकरीता लागणारा पल्प या सारखे पदार्थ तयार करण्यासाठी छोट्या उद्योगांच्या निर्मितीद्वारे रोजगाराची साधने निर्माण होवून त्याद्वारे ग्रामीण विकास शक्य असल्याचे प्रतिपादन भुपृष्ठ वाहतूक व महामार्ग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्राद्वारे आयोजीत जैवउर्जा-हवामान अद्ययावत नुतनीकरणक्षम उर्जा ः सद्यस्थिती आणि पुढील दिशा या विषयावरील ऑनलाईन राष्ट्रीय वेबीनारमध्ये मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा होते. यावेळी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संचालक संशोधन तथा विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. चिंतामणी देवकर, नियंत्रक श्री. विजय कोते, कास्ट प्रकल्पाचे प्रमुख शास्त्र्रज्ञ डॉ. सुनिल गोरंटीवार व प्रगतशील शेतकरी कृषिभुषण श्री. सुरसींगराव पवार हे यावेळी उपस्थित होते.
मा. ना. श्री. नितीनजी गडकरी बोलतांना पुढे म्हणाले की पंजाब, हरियाणा या राज्यात भाताचे तसेच उत्तर प्रदेशातून साखरेचे जास्तीच्या उत्पादनाचे जैव इंधनात रुपांतर करणे गरजेचे आहे. हवाई तसेच सागरी वाहतूकीसाठी लागणार्या इंधनाची गरज या जैव इंधनाद्वारे पूर्ण केली तर जीवसृष्टी तसेच पर्यावरण संवर्धन होऊन वातावरणाचे होणारे प्रदुषण कमी होईल. शेतातील बायोमास तसेच बांबू सारख्या हरीत उर्जेचे रुपांतर करुन त्याचा उपयोग फर्निचर निर्मिती, पेपर इंडस्ट्रीमध्ये केला तर जंगलांचे संवर्धन होऊन आपला पेपर पल्प आयातीवरील खर्च कमी होईल. यासाठी पीक पध्दतीत बदल करणे गरजेचे असून बांबूसारख्या पर्यावरण पूरक पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकर्यांना प्रवृत्त करावे लागेल.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले तर आभार डॉ. अशोक फरांदे यांनी मानले. या ऑनलाईन वेबीनारसाठी युट्युब, फेसबुक व सिस्को वेबेक्स अॅप या माध्यमांद्वारे देशभरातून शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ऑनलाईन वेबीनारसाठी कास्ट प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. मुकुंद शिंदे, इंजि. मोहसीन तांबोळी व डॉ. व्ही.एस. मालुंजकर यांचे योगदान लाभले.

Share this story