अहिल्यानगर,
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार अहिल्यानगर मनपा स्वीप समितीच्या वतीने “माझी मनपा सेल्फी” संकल्पनेअंतर्गत सुमारे १५ वैशिष्ट्यपूर्ण सेल्फी पॉईंट्स उभारण्यात आले आहेत. मतदान कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण ठिकाणी तसेच ‘स्वीपनगरी’मध्ये हे पॉईंट्स प्रदर्शित करण्यात आले आहेत.
मतदानाची तारीख असलेल्या ‘१५’ या अंकाच्या आकाराचे सेल्फी पॉईंट्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. “१५ तारखेला मतदानाची टक्केवारी (Voter Turnout) वाढवा,” असा संदेश देणाऱ्या या सेल्फी पॉईंट्सवर अनेकांनी उत्साहाने सेल्फी काढले. शहरातील उद्याने आणि मुख्य चौकांमध्येही हे सेल्फी पॉईंट्स लावण्यात येत आहेत.
या सेल्फी पॉईंट्सवर “आपले मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी आहे”, “एक वोट सेल्फी तो बनता है”, “मैं भारत हूँ.. मैं मेरे लिये मतदान करूँगा”, “मी महाराष्ट्र आहे.. मी माझ्यासाठी मतदान करणार”, “मी अहिल्यानगर आहे… मी माझ्यासाठी मतदान करणार” तसेच “रिश्ते में तो हम तुम्हारे भारतीय लगते हैं.. नाम है अहिल्यानगर के मतदार”, “आमचं अहिल्यानगर भारी.. आमचं मत भारी.. १५ जानेवारीला आमचं मतदान पण भारी” अशा आकर्षक घोषवाक्यांनी मतदारांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
’एकी’ नावाची मुंगी (मॅस्कॉट) आणि विविध भौमितिक आकारातील सेल्फी पॉईंट्स अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. प्रशिक्षणाच्या दोन टप्प्यात हजारो कर्मचाऱ्यांनी येथे सेल्फी काढले. “आपले नाव मतदार यादीत शोधा”, “आपले मतदान केंद्र शोधा”, “मनपा स्वीप समितीचे उपक्रम पहा” व “आपले सेल्फी फोटो व्हॉट्सॲपवर अपलोड करा” अशा ४ संकल्पनांचे ४ क्यूआर (QR) कोड येथे लावण्यात आले आहेत. 8055809394 या अहिल्यानगर मनपाच्या ‘स्वीप केअर’ व्हॉट्सॲप क्रमांकावर आपला सेल्फी पाठवल्यास सहभागींना प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
या उपक्रमासाठी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंढे, स्वीप नोडल अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अशोक साबळे, सहाय्यक आयुक्त सपना वसावा, मेहेर लहारे, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, मतदारदूत डॉ. अमोल बागुल, प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.