अहिल्या नगर
अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत विरोधी उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले तसेच उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे पाच उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
प्रभाग ८ ड मध्ये राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) उमेदवार कुमार वाकळे यांच्या विरोधात एकमेव अपक्ष उमेदवारी अर्ज होता. त्या अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने कुमार वाकळे हे बिनविरोध झाले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रभाग १४ मधील उमेदवार प्रकाश भागानगरे हे देखील बिनविरोध झाले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने (अजित पवार गटाने) खाते उघडले आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी उद्या (दि.२) दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. त्यामुळे माघारीकडे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जावर काल, बुधवारी (दि.३१) छाननी करण्यात आली आहे. या छाननीत शिवसेना (शिंदे गटाला) चांगलाच धक्का बसला. शिंदे गटाच्या ५ जणांचे उमेदवारी अर्ज बाद ठरले आहेत.
शिंदे सेनेकडून ५४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील ५ अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत.
अर्जावर अनुमोदकाची चुकीची स्वाक्षरी केल्याने एक, एबी फॉर्म न जोडल्याने एक,एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडल्याने एक तर एबी फॉर्मवर खाडाखोड केल्याने दोन असे एकूण पाच उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत.त्यामुळे पक्षाचे शिंदे सेनेचे ४९ उमेदवार सध्या रिंगणात आहेत.