दिनांक: 28 ऑक्टोबर 2025 | ठिकाण: मुंबई / अकोले
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घोषित केल्या प्रमाणे जिल्ह्यातील “ऑपरेशन लोटस”ला अकोले तालुक्यातून सुरूवात झाली आहे. अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या व्हा. चेअरमन श्रीमती सुनिता भांगरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला असून, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे.
दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी अनेक पदाधिकारी भाजपमध्ये येणार असल्याचे संकेत दिले होते. त्याचाच परिणाम म्हणून हा पक्ष प्रवेश झाला आहे.
माजी आमदार वैभव पिचड आणि सुनिता भांगरे यांनी दिवाळीत मंत्री विखे पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. आज मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
या वेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार वैभव पिचड, जेष्ठ नेते सिताराम भांगरे, सुहास वहाडणे, विनायकराव देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्व नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विकासाचे नवे पर्व सुरू असल्याचे सांगितले. “सबका साथ, सबका विकास” या मंत्राने पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भांगरे परिवाराच्या प्रवेशाचे स्वागत करून अकोले तालुका भाजपमय करण्याचा निर्धार व्यक्त केला. माजी आमदार वैभव पिचड यांनी हा प्रवेश आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी निर्णायक ठरेल असे सांगितले.