बीड, दि.16,
Beed farmar ajit pawar annauncement बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकरी नागरिकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा दिलासा दिला आहे.जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे उदभवलेल्या पूर परिस्थितीने झालेल्या नुकसानीचे कोणताही भेदभाव न करता तातडीने पंचनामे करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी 14 व 15 सप्टेंबर रोजी आलेल्या अतिवृष्टीने उदभवलेल्या परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीला खासदार बजरंग सोनवणे, आमदार सर्वश्री विक्रम काळे, सुरेश धस, प्रकाश सोळंके, धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित, आमदार श्रीमती नमिता मुंदडा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत,अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवशंकर स्वामी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री. पवार पुढे म्हणाले की, जिल्हा प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांना भरपाईसाठी जे प्रस्ताव येतील, त्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन नुकसानग्रस्तांना डीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात नुकसानीची रक्कम जमा करण्यात येईल. जिवीत हानी झाली असेल तर संबंधितांच्या वारसांना तातडीने मदत करण्यात येईल. पुरात वाहून गेलेल्या जनावरांचे शवविच्छेदन करुन त्यांच्या मालकांना देखील त्वरित मदत करण्यात येईल. तसेच ज्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात यावेत. संबंधित विभागाला त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नाल्यांवरील पुलांसाठी यापुढे गोलपाईपचा वापर न करता चौकोनी बॉक्सचे पाईप वापरण्यात यावेत असे सांगून श्री. पवार पुढे म्हणाले की, त्यामुळे पुलात कचरा अडकणार नाही व पुलाची क्षती होणार नाही. मयतांच्या वारसांना 48 तासाच्या आत मदत करण्यात यावी. खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. नागरिकांच्या घरामध्ये पाणी साचून नुकसान झाल्याचे पंचनामे पूर्ण करुन त्यांना मदत देण्यात यावी. शेतकऱ्यांच्या विहिरीत गाळ साचून विहिरी क्षतिग्रस्त झाल्या असल्यास त्याबाबतचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. तसेच कांदाचाळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण करुन शासन निकषाप्रमाणे बाधितांना त्वरित मदत वितरित करावी. बाधितांना त्वरित मदत मिळण्यासाठी सर्वांनी सर्वोतोपरी कार्यवाही करावी. लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यावर कार्यवाही करण्यात यावी. माहे मे २०२५ मध्ये झालेल्या शेती पीक नुकसान भरपाईसाठी प्राप्त २९ कोटी रुपयांचे वाटप शिल्लक आहे. संबधित शेतकऱ्यांची ई केवायसी करून या निधीचे वाटप येत्या ७ दिवसात पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
खासदार श्री. सोनवणे यावेळी म्हणाले की, अतिवृष्टीने वीज वितरण कंपनीच्या मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. ॲक्शन मोडवर नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आमदार धनंजय मुंडे म्हणाले, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानीचे, सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, असे ते म्हणाले.
आमदार सुरेश धस म्हणाले, 14 व 15 सप्टेंबर रोजी आलेल्या अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण होऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व वीज वितरण कंपनीचे तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यासाठी निधी उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांनी वेळेत भरपाई देण्यात यावी.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. जॉन्सन यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती सादरीकरणातून दिली. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील 32 मंडळात अतिवृष्टी झाली असून 14, 15 व 16 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील 47 मंडळात अतिवृष्टी झाल्याची माहिती त्यांनी दिली. श्री. जॉन्सन माहिती देताना म्हणाले, बीड तालुक्यातील 15 मंडळात अतिवृष्टी झाली. 14 सप्टेंबर रोजी आष्टी तालुक्यातील दोन व्यक्ती पुरात वाहून गेल्याने मृत्यूमुखी पडल्या. 57 दुधाळ जनावरांचा तर 19 लहान जनावरांचा मृत्यू झाला. 8 अन्य ओढकाम करणारी व 1 लहान जनावर अशा एकूण 85 जनावरांचा मृत्यू झाला. अतिवृष्टीमुळे शिरुर तालुक्यातील 20 घरांची पडझड झाली तर 122 कच्च्या घरांची पडझड झाली. जिल्ह्यातील 1 हजार 31 गावे पुराने बाधित झाली असून बाधित शेतकऱ्यांची संख्या 5 लाख 30 हजार 122 इतकी आहे. 3 लक्ष 47 हजार 722 जिरायती शेतीचे, 15 हेक्टर बागायती शेतीचे असे एकूण 3 लाख 47 हजार 737 हेक्टवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 85 शाळांची अतिवृष्टीमुळे पडझड झाली असून नुकसानीच्या दुरुस्तीसाठी अंदाजे 2 कोटी 63 लक्ष रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती यावेळी त्यांनी सादरीकरणातून दिली. बैठकीस संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.