ताज्या घडामोडीमुंबई

डाॅक्टरांच्या रुपात प्रकटलेली बीडची आधुनिक “दुर्गा”

नाजमिन तीन महिन्यापासून लढा देतेय, कोरोनासारख्या महिषासुराशी

शेअर करा

राजेंद्र जैन / कडा
—————–
उत्सव सत्याचा, उत्सव विजयाचा, जागर नव दुर्गेचा. गणेशोत्सवा पाठोपाठ सर्वांनाच वेध लागतात नवरात्रीचे, नवरात्री म्हटले की, देवीची आराधना, देवीची उपासना व देवीची भक्ती. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीचा तो उत्साह आता दिसणार नाही. मस्तावलेल्या अन् उपद्रवी महिषासुराचा वध करण्यासाठी दुर्गा देवीने नऊ दिवस अखंड लढा देत अखेर त्या राक्षसाचा शिरच्छेद केल्याची अख्यायिका आहे. मात्र मागील तीन महिन्यापासून स्वत:चा जीव धोक्यात घालून अक्षरश: निष्पाप जीवांना वाचविण्यासाठी डाॅक्टरच्या रुपात प्रकटलेली आधुनिक दुर्गा नाजमिन कोरोनासारख्या जीवघेण्या महिषासुराशी रुग्णालयात रात्रंदिवस लढताना दिसत आहे.

परिस्थिती कितीही प्रतिकुल असली तरी फक्त स्वत:मध्ये शिकण्याची जिद्द, चिकाटी अन् आत्मविश्वास असेल तर जगात कुठलीही गोष्ट अशक्य नसते. नियतीला पण तिथंच झुकावे लागते. हेच बीड येथील नाजमिन जावेद आतार नावाच्या रिक्षाचालकाच्या सुकन्येने परिस्थितीवर मात करुन दाखवून दिले. उस्मानाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात बीएएमएस पदवी संपादन करुन नाजमिनने आई-वडिलांच्या पंखांला बळ दिले आहे. वडील जावेद यांनी रात्रंदिवस आॅटोरिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. परंतू मुलीचं डाॅक्टर होण्याचं स्वप्न बापाने प्रत्यक्षात साकारले. आपणही समाजाचं काहीतरी देणे लागतोत. याच हेतूने समाजऋणातून उतराई होण्यासाठी रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा समजूूूून या सुकन्येेने स्वत:ला रुग्णसेवेत झोकून दिले. वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजू…अशी हिंमत बाळगून एकवटलेली जहांबाज नाजमिनच्या साहसाला दाद द्यावी लागेल. कारण ती अक्षरश: दुर्गा बनून मागील तीन महिन्यापासून घर सोडून कोरोनासारख्या जीवावर उठलेल्या राक्षसाचा अंत करण्यासाठी सहकार्यांसोबत बीडच्या शासकीय रुग्णालयात कोविड-19 सेंटरमध्ये झुंज देत आहे. विशेष म्हणजे वाघीणीने एकही दिवस सुट्टी न घेता स्वत:चा जीव धोक्यात ठेऊन कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या निष्पाप जिवांसाठी डाॅक्टरच्या रुपात नाजमिन अक्षरश: आधुनिक दुर्गा बनून प्रकटली आहे. कोविड रुग्णालयात पीपीई कीट धारण करुन ही दुर्गा कोरोनासारख्या महिषासुर राक्षसाशी रात्रंदिवस लढा देताना दिसत आहे.

 

हेही वाचा :दसरा मेळावा प्रकरणी पंकजा मुंडे सह 50 जणांवर गुन्हा दाखल

——-&&———-
भगवान, अल्ला रक्षा करेंगे…
——————
आपली मुलगी कोविड सेंटरमध्ये काम करीत असताना काळजी वाटत नाही का, असा प्रश्न विचारतात, वडील म्हणाले, हमारी बेटी किसी की, जान बचाने के लिए अपनी जान खतरे में डाल सकती है, तो भगवान और अल्ला उसकी रक्षा जरूर करेंगे, हमें विश्वास है !
– जावेद आतार, वडील रिक्षाचालक
————————-
रुग्णासाठी मानसिक आधार महत्वाचा….
————-
आजारापेक्षा रुग्ण खुपदा मनानेच खचलेला असतो. अशावेळी औषधांबरोबर मानसिक आधार देणे, तसेच आपुलकी प्रेम देऊन रुग्णाच्या दु:खाची तीव्रता कमी करणे, हेच डाॅक्टर म्हणून कर्तव्य ठरते. परंतू रुग्णसेवेतून मिळणारं समाधान आत्मिक आहे.
– डाॅ. नाजमिन आतार

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close