Thursday, September 4, 2025
HomeUncategorizedसकारात्मक, विश्लेष्णात्मक पत्रकारितेवर माध्यमांनी अधिक भर द्यावा

सकारात्मक, विश्लेष्णात्मक पत्रकारितेवर माध्यमांनी अधिक भर द्यावा

बीड,

Beed news समृद्ध लोकशाहीसाठी प्रसार माध्यमे, प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय आवश्यक आहे. नागरिक व प्रशासनात समन्वय साधण्यासाठी माध्यमे मोलाची जबाबदारी पार पाडत असतात. तरीही माध्यमांनी सकारात्मक, विश्लेष्णात्मक पत्रकारितेवर अधिक भर द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज येथे केले.     

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह येथे माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या बीड जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पत्रकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी जॉन्सन यांच्याहस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.

प्रमुख मार्गदर्शक दीपक रंगारी, माध्यम तज्ज्ञ डॉ. प्रभू गोरे, प्रा. शिवशंकर पटवारी, प्र. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. श्याम टरके यांची उपस्थिती होती.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.

जिल्हाधिकारी जॉन्सन म्हणाले, शासन, जिल्हा प्रशासन नागरिकांच्या समस्या, प्रश्न सोडाविण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता जिल्हा स्तरावर होत असलेल्या जनता दरबार प्रमाणे तालुका स्तरावर देखील अधिकारी जनता दरबार
घेत आहेत.

जनतेचे प्रश्न, समस्या सोडवत आहेत. जनमत घडवण्याचे काम माध्यमे प्रभावीपणे करतात. त्यामुळे आजच्या नवमाध्यमाच्या युगात आणि समाज माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेता सत्य माहिती जनतेला देण्याची जबाबदारी माध्यमांना पार पाडावी लागणार आहे.

तसेच नागरिकांना त्यांच्या कर्तव्याप्रती जागरूक करण्याची जबाबदारीही माध्यमांनी पार पाडणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी जॉन्सन म्हणाले. आजच्या या कार्यशाळेतून पत्रकारांसाठी असलेल्या शासनाच्या योजना, सवलत, सोयी सुविधा यांची माहिती होण्यास उपयोग होईल, त्याचाही पत्रकारांनी लाभ घ्यावा, असेही जिल्हाधिकारी जॉन्सन म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्याम टरके यांनी केले. आभारही त्यांनीच मानले. कार्यशाळेबाबत प्रातिनिधिक स्वरूपात संपादक बाळासाहेब फपाळ यांनी मनोगत व्यक्त केले.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन
माहिती आणि महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित पत्रकारांसाठी कार्यशाळेत तज्ज्ञांनी पत्रकारांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता, प्रमाणभाषा लेखन, समाज माध्यमांसाठी लेखन कौशल्ये याबाबत मार्गदर्शन केले.

प्रा. रंगारी यांनी ‘वृत्त संकलन आणि संपादनात शुद्धलेखनाचे महत्त्व’ याविषयी मार्गदर्शन केले. मराठी प्रमाणभाषेच्या शुद्धलेखनाचे नियम, शब्दांचा अर्थ, भाषेतील व्याकरणाचा वापर याबरोबरच मराठी भाषा समृद्ध करण्यात विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाविषयी माहिती दिली.

वाक्यामध्ये येणारी क्रियापदे, शब्दयोगी अव्यय, ऱ्हस्व, दीर्घ, ईकारांत याबरोबरच एकाक्षरी क्रियापद, शब्दयोगी अव्यय, तत्सम आणि तद्भव शब्दांविषयीचे स्पष्टीकरण उदाहरणासह समजावून सांगितले. पत्रकाराने शब्दकोश आणि लेखनकोश याचा वापर करून निर्दोष लिखाण याविषयी मार्गदर्शन केले. विविध शब्दांच्या वाक्यानुसार आणि वेळेनुसार होणारा बदलही त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले.

अधिस्वीकृती नियमावली, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी या विषयांवर प्र.जिल्हा माहिती अधिकारी डॉ.टरके यांनी माहिती दिली.

समाज माध्यमांसाठी लेखन कौशल्ये या विषयांवर डॉ. गोरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. संक्षिप्तता, थेट आशय, छोटी वाक्ये, शब्दांचे महत्त्व, योग्य मथळा, सातत्याने समाज माध्यमावर लिहा, योग्य हॅशटॅग, थंबनेल, ग्राफिक्स, भाषा आणि टोन आदी बाबींवर मार्गदर्शन केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता याविषयावर प्रा. पटवारी यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता पूर्वीची पत्रकारिता, भाषा, कला, शास्त्र, संस्कृती, राष्ट्रीय -प्रादेशिक वृत्तपत्रे यांची स्थिती आणि सद्यस्थितीत वापरात येत असलेली सॉफ्टवेअर, ऍप्स आदीबाबतीत सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेसाठी पत्रकारांच्या संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, शहरासह, जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments