ताज्या घडामोडी

Corona breaking *अहमदनगर मध्ये आणखी एक रुग्ण कोरोना संसर्ग बाधित ,कोरोनाग्रस्तांची संख्या आता तीनवर*

शेअर करा

 

अहमदनगर, दि. 24 मार्च टीम सीएमन्यूज

जिल्हा रुग्णालयाने काल (सोमवारी) राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठविलेल्या १३ स्त्राव नमुन्यापैकी जिल्ह्यातील आणखी एक व्यक्ती कोरोना संसर्ग बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हयातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे.
सदर बाधित रुग्ण हा डॉक्टर असून खासगी प्रॅक्टीस करीत असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले. त्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
एकूण २१८ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यापैकी १३ व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी काल पाठविण्यात आले. त्यांचा अहवाल आल्यानंतर एक व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले. सदर व्यक्ती सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्याने एका खाजगी हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत होती. दरम्यान, सदर व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची माहिती काढली जात आहे. त्याच्यावर उपचार केलेल्या डॉक्टर्स आणि नर्स यांना तात्काळ स्त्राव नमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात बोलावण्यात आले आहे. यासंदर्भातील निर्देश जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. तसेच, संबंधित रुग्णाला तात्काळ विलगीकरण (आयसोलेशन) कक्षात हलविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आतापर्यंत २०० जणांचे स्त्राव नमुने आतापर्यंत निगेटीव आले आहेत. दरम्यान, एकूण २६३ व्यक्तींची तपासणी जिल्हा रुग्णालयामार्फत करण्यात आली आहे.
सदर व्यक्ती परदेशातून आलेला नाही. त्यामुळे तो कोरोना बाधित कशामुळे झाला, याची माहिती घेण्याचे काम आरोग्य यंत्रणेने सुरु केले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तसेच त्याच्या कुटुंबियांची माहिती घेतली जात आहे.
दरम्यान, नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. स्वताच्या आरोग्याची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नका आणि सार्वजनिक संपर्क टाळा, या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आता वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. जिल्हा यंत्रणेबरोबरच आता महसूल, आरोग्य आणि पोलीस दलाच्या सहकार्याने ग्रामीण भागातही गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close