मुंबई
Dynanjyoti Savitribai phule pursaskar लैंगिक अत्याचारित बालकांना अनाथ मुलांप्रमाणेच शिक्षण आणि नोकऱ्यात शासनाने 1 टक्का स्वतंत्र राखीव जागा द्याव्यात, अशी विनंती महाराष्ट्र शासनास डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांनी केली.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागातर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो.
स्नेहालय संस्थेच्या स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राच्या संस्थापिका
डॉ.प्राजक्ता कुलकर्णी यांना उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील , माजी मंत्री छगन भुजबळ, सर नाथाबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव , राज्याचे शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांनी विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात हा पुरस्कार काल प्रदान केला.
यावेळी डॉ.प्राजक्ता यांनी मागील तीन दशकातील अनाथ मुले ,बालमाता, बालवधू , देहव्यापारातील बळी महिला,यांच्यासोबत काम करतानाचे काही अनुभव सांगितले.
डॉ. प्राजक्ता यांनी टीम स्नेहालय तर्फे या पुरस्काराचा स्वीकार करीत असल्याचे आरंभीच नमूद केले. राज्य शासनास त्यांनी विनंती केली की, लैंगिक अत्याचाराला बळी पडणाऱ्या बालिका आणि महिलांच्या परीत्यागपत्रात तसेच न्यायालयीन कागदपत्रात बालकांसाठी अनौरस हा शब्द सातत्याने वापरला जातो. वास्तविक कोणतेही मूल हे नैसर्गिक प्रक्रियेतूनच जन्माला येते. कोणतेही मुल नव्हे तर त्याचे पालकत्व नाकारणारे वडील हेच वास्तवात अनौरस असतात. हे बिरूद बालकांना लावणे त्यांच्याबद्दल नकारात्मक भाव तयार करते.
त्यामुळे पितृत्व नाकारलेल्या बालकांबाबत अनौरस या शब्दप्रयोगास बंदी घालण्यात यावी असे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.
फुले दांपत्याचा वारसा
डॉ. प्राजक्ता म्हणाल्या की,भारतातील पहिले दत्तक विधान केंद्र स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंधक गृह, या नावाने सावित्रीबाई आणि ज्योतीराव फुले दांपत्याने पुणे येथे वर्ष 1873 मध्ये काढले. 1874 साली त्यांनी एका बालविधवेचा मुलगा यशवंत याला स्वतः दत्तक घेतले. हाच वारसा जपत स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राने आजवर 2 हजारांवर बालके आणि बालमातांचे यशस्वी कौटुंबिक पुनर्वसन केले. उडान या प्रकल्पाद्वारे स्नेहालय ने सुमारे 600 बालविवाहंमध्ये मागील 5 वर्षात यशस्वी हस्तक्षेप केला. 31 डिसेंबर 2027 अखेर नगर जिल्हा 100% बालविवाह आणि स्त्रीभ्रूणहत्या मुक्त करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून संस्था कार्यरत आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी असे कालबद्ध सामाजिक उद्दिष्ट ठरवून शासन आणि सामाजिक संस्थांनी संघटित काम करावे, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.
टीम स्नेहालय आणि मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू आणि अधिष्ठाता यांचा या कार्यक्रमानंतर संवाद झाला.SNDT विद्यापीठ आणि स्नेहालय लवकरच सामंजस्य करार करणार असून महिलांच्या प्रश्नांवरील संयुक्त संशोधन आणि विद्यार्थ्यांसोबत कार्य प्रकल्प भविष्यात राबविले जाणार आहेत.