गुणग्राहक आणि संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत आहेत-श्रीकांत कुलकर्णी
NMMS

आष्टी -प्रतिनिधी

    यश मिळवण्यासाठी परिस्थितीवर मात करायला शिकले पाहिजे. त्याचबरोबर शिक्षणात पालकांची भूमिका महत्त्वाची असते.  आई वडिलांच्या कष्टाची विद्यार्थ्यांनी जाण ठेवावी आणि आपल्या आयुष्यात अत्युच्च क्षमतांचा वापर करावा.  गावातील पालकांनी शिक्षकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे. विद्यार्थ्यांनी जिज्ञासा ठेवून जगायला शिकलं पाहिजे. असे प्रतिपादन जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती NMMS योजनेतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव करताना पांगुळगव्हाण येथे बोलत होते.

या कार्यक्रमासाठी बीड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे हेही उपस्थित होते.

यावेळी विक्रम पोकळे बोलताना म्हणाले की, शिक्षक आणि पालक यांच्या सहकार्यातूनच शाळेचा विकास शक्य आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती सत्यात उतरवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले पाहिजेत. आज मिळवलेल्या यशाने या विद्यार्थ्यांचे जग मोठे होईल आणि हे जीवनात यशस्वी होतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

समाजसेवक विजय गोल्हार हेही या कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी ते म्हणाले की, या स्पर्धा परीक्षेतून उद्याचे  अधिकारी घडल्याशिवाय राहणार नाहीत. शिक्षणानेच माणूस यशस्वी होऊ शकतो याशिवाय दुसरा मार्ग नाही असे उद्गार सतीश आबा शिंदे यांनी काढले. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक हरिभाऊ गिते, शिक्षणप्रेमी भगवान गिते, केंद्राचे केंद्रप्रमुख प्रदीप बहिर केंद्रीय मुख्याध्यापिका अशा पत्की, माजी केंद्रप्रमुख चंद्रकांत शिंदे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप देवकाते तर शाळेचे मुख्याध्यापक विष्णू नन्नवरे यांनी शाळेची यशोगाथा मनोगतातून व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते. कोवीड नियमांचे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशा या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वानंद थोरवे तर कार्यक्रमाचे आभार गणेश गळगटे यांनी मानले.

Share this story