परळी / प्रतिनिधी
Government’s plan to destroy agricultural culture शेतकरी अडचणीत असल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून दिसत आहे. अगोदर शेतीला असलेली प्रतिष्ठा कमी झाली आहे. हे आपोआप होत नाही, तर शेतकऱ्यांना शेतीबाह्य करण्याचा, कृषी संस्कृती नष्ट करण्याचा हा सरकारचा डाव आहे. तो शेतकऱ्यांनी ओळखावा, असे आवाहन कृषीभूषण विजय अण्णा बोराडे यांनी केले. ‘शेतकऱ्यांसमोरील आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते.
शेतकरी कीर्तन महोत्सवातून होत असलेली जनजागृती खूप मोलाची आहे, असे सांगून बोराडे पुढे म्हणाले की, आज कितीही प्रयत्न केला तरी खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसत नाही. शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी खत-बियाणे घरचेच असायचे, दरडोई शेती क्षेत्राचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे एखादे शेतीचे पीक फसले तरी खर्च नसल्याने ताण येत नव्हता. एका शेतीत नुकसान झाले तर दुसर्या शेतीतून ते भरभरून निघत होती. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. थोडीच शेती, त्यातच जास्त उत्पादन घेण्याच्या आशेने केलेला भरमसाठ खर्च आणि ते फसल्यानंतर येणारी हतबलता शेतकऱ्यांना निराशेकडे नेत आहे. ही परिस्थिती कृत्रिमरीत्या निर्माण केली जात आहे. वर शेती परवडत नाही, असा जोरकस प्रचार केला जात आहे. हा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना शेतीतून बाहेर काढण्याचा डाव आहे. एकीकडे शेती परवडत नाही, असा प्रचार केला जात आहे आणि दुसरीकडे मागेल ती किंमत देऊन शेती शेतकऱ्यांकडून काढून घेतली जात आहे. एकीकडे शेती परवडत नाही म्हणायचे आणि दुसरीकडे तिला भरमसाठ किमत देऊन शेतकऱ्यांकडून काढून घ्यायचे, हा शेतकऱ्यांना शेती बाह्य करण्याचा डाव आहे तो ओळखून वेळीच सावध व्हा आणि आपल्या बापजाद्यांची शेती जपा, असे आवाहन त्यांनी केले.
वारकरी संप्रदाय संघाकडून पंतांकडे देऊ नका
वारकरी संप्रदाय सध्या संत विचारांकडून पंत विचारांकडे घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशा कळात शेतकरी कीर्तन महोत्सवातून वारकरी शुद्ध विचार रुजविण्याचे काम केले जात आहे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्मकांडातून होणाऱ्या पिळवणुकीतून शेतकऱ्यांनी मुक्त व्हावे. लग्नातील वाढता खर्च टाळला पाहिजे. बारावे, तेरावे याला किती महत्त्व द्यायचे याचा विचार करावा. पूर्वी साधन नव्हती निरोप पोहचत नव्हते. म्हणून तिसऱ्या दिवशी सावडणं, दहाव्या दिवशी पिंडदान वगैरे प्रथा होत्या. आता एखादी व्यक्ती गेली तर काही मिनिटांत सर्व नातेवाईकांना निरोप पोहचतो. म्हणून आता जुन्या प्रथांत बदल केला पाहिजे, हे एक वारकरी म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, असे सांगून विजय अण्णांनी आपली माळचं श्रोत्यांना दाखविली.
तुकाराम महाराज यांनी धर्म सत्तेविरुद्ध संघर्ष केला!-फडतरे महाराज
शेतकरी, कष्टकरी यांना धर्माधिष्ठित शोषणापासून मुक्त करण्यासाठी तुकाराम महाराज यांनी जनजागृती केली त्यासाठी त्यांना धर्म सत्तेविरुद्ध जोरदार संघर्ष करावा लागला, असे प्रतिपादन ह.भ.प. डाॅ. सुहास महाराज फडतरे यांनी केले. शेतकरी कीर्तन महोत्सवातून शेतकरी, कष्टकऱ्यांना जगण्याचे बळ मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
धर्माधिष्ठित समाज व्यवस्थेने जे अधिकार शुद्र, अतिशूद्र आणि महिलांना नाकारले होते, ते अधिकार मिळविण्यासाठी संत परंपरेने प्रयत्न केले. त्यामुळेच संतांना धर्म सत्तेकडून त्रास झाला. तुकाराम महाराज यांना तर तीन वेळा धर्म पिठासमोर हजर रहावे लागले. बरं धर्म पिठात न्याय देणारे, फिर्याद देणारे आणि वकील सर्वच उच्च वर्णीय होते, ते तुकाराम महाराज यांना न्याय देतील का, परंतू त्यांच्या संघर्षामुळेच धर्माधिष्ठित न्याय व्यवस्था जाऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची न्याय व्यवस्था आली आहे, ती जपण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया, असेही फडतरे महाराज म्हणाले.