*पाण्यासाठी केळसांगवीतील महिलांचा सामाजिक अंतर ठेऊन ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा*
आष्टी दि,२७ मे टीम सीएम न्यूज
आष्टी तालुक्यात पाणी टंचाई गंभीर स्वरूप धारण करत आहे.टाळेबंदीच्या काळात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईला तोंड फुटत आहे.टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर महिलांनी पाण्यासाठी केळसांगवी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. यावेळी सरपंच गंगाधर पडोळे यांनी महिलांना लवकरच टँकर पुरविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
केळसांगवी येथील महिलांनी आज ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा आणला होता.यावेळी महिलांनी हंडा घेऊन ग्रामपंचायत समोर सामजिक अंतर ठेऊन आंदोलन केले. यावेळी महिलांनी सांगितले कि, गावात पाण्याच्या नळाला मीटर बसविलेले आहेत. टाळेबंदी मुळे नागरिकांकडे पैसे नाहीत, दलित वस्तीतील महिलांची अडचण आहे, पैसे नसल्याने मीटरचे पैसे देऊ शकत नाहीत, हातपंपाला पाणी नाही त्यामुळे महिलांची पाण्यासाठी वणवण होत आहे.
अधिक वाचा:बीडमध्ये दोघां कोरोना मुक्तांची केक कापून बँड पथकाच्या सलामीने घरी बिदाई
यावेळी बोलताना सरपंच गंगाधर पडोळे यांनी सांगितले कि, गेल्या दीड महिन्यापूर्वी पंचायत समितीला टँकरचा प्रस्ताव दिला आहे मात्र अद्याप मंजूर नसल्याने पाणी टंचाई जाणवत आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी यांनी भेट दिली असून लवकरच टँकर मंजूर केले जाणार आहे असेही त्यांनी सांगितले. या महिलांना आता पाण्याची प्रतीक्षा आहे. टाळेबंदीत नागरिकांच्या गरजाकडे दुर्लक्ष केले जात असून पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी महिला करत आहेत.