Corona fight *सार्वजनिक ठिकाणची गर्दी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी उतरले रस्त्यावर*

 

अहमदनगर, दि. 20 मार्च, टीम सीएमन्यूज

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली असतानाच प्रशासनाचे प्रतिबंधाचे आदेश न मानणार्‍या नागरिकांना खुद्द जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीच फटकारले. या संकटाचे गांभीर्य ओळखा, विनाकारण घराबाहेर पडू नका, असे त्यांना सुनावले. शाळा-महाविद्यालये आणि इतर आस्थापना बंद करण्याचे आदेश देऊन नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, तो झुगारुन चौकाचौकात फिरणार्‍या नागरिकांना पोलिसांनीही कायद्याचा बडगा दाखवला. कोरोनाचे गंभीर संकट ओळखून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन

करण्यात आले आहे. दरम्यान, आज आणखी २५ जणांच्या स्त्राव नमुन्यांचा अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला. हे सर्व अहवाल कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले. अजून ७८ व्यक्तींच्या स्त्राव नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ७९ व्यक्तींना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तर दोन बाधित व्यक्तींना बूथ हॉस्पिटल येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

कोरोनाचा विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक स्तरावर उपाययोजना सुरु केली आहे. नागरी व ग्रामीण भागात विविध बाबींना बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना ही बंदी लागू करण्यात आली आहे. विविध आस्थापनांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने वारंवार केले आहे. तरीही काही ठिकाणी नागरिक कट्ट्यावर बसल्याचे चित्र आढलून आल्याने पोलीसांनी त्यांना कायद्याचा बडगा दाखवला. स्वता जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी हेही शहरात विविध भागात फिरुन परिस्थितीचा आढावा घेत होते. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी नागरिकांनी प्रशासनास सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले, मात्र, ज्या व्यक्ती या आदेशांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कार्यवाहीचे निर्देश त्यांनी पोलीस यंत्रणेला दिले.

दरम्यान, परदेश वारी करुन आलेल्या प्रत्येक नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. नागरिकांनीही अशा व्यक्तींची माहिती प्रशासनाला कळवावी, जेणेकरुन त्या व्यक्ती बाधित आहेत किंवा कसे, याची तपासणी करणे सोपे होईल आणि जिल्हयातील या विषाणू प्रसाराचा धोका टळेल. त्यानुसार आतापर्यंत १५५ नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आले. आजअखेर ७५ व्यक्तींचे अहवाल निगेटीव आले असून त्यांना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यासाठी त्यांच्या हातावर तसा शिक्काही मारण्यात आला आहे. अशा प्रकारे कोणतीही व्यक्ती बाहेर आढळून आल्यास जिल्हा प्रशासन अथवा आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, सर्वप्रथम बाधित झालेल्या रुग्णाचा काल एनआयव्हीकडे पाठविलेला अहवाल निगेटीव आला आहे. आता पुन्हा दुसरा स्त्राव नमुना आज तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.

Share this story