विशेष

*कला व कलाकारांवर प्रेम करणारे ‘बाळासाहेब’* ….

विशेष लेख

शेअर करा

 

 

*- प्रमोद कांबळे, चित्र शिल्पकार, नगर*

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वोच्च लोकप्रिय नेता एवढीच त्यांची ओळख निश्चितच नाही. स्वत: अतिशय उत्कृष्ट व्यंगचित्रकार असलेले बाळासाहेब ठाकरे कलेवर व कलाकारांवर मनस्वी प्रेम करणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या व्यंगचित्रांच्या फटकार्यांनी अनेकांना घायाळ केले. मलासुद्धा त्यांच्या या कलेने कायम मोहिनी घातली. विशेष म्हणजे आयुष्यात दोन वेळा बाळासाहेबांना जवळुन पाहण्याची, संवाद साधण्याची संधी मला मिळाली. ते दोन्ही प्रसंग आजही आठवले तरी एक कलाकार म्हणून खुप प्रेरणा मिळते. *पहिला प्रसंग आहे १९८०च्या काळातील.* त्यावेळी मी मुंबईतच जे.जे.स्कुलला शिकत होतो. आमचं वसतीगृह वांद्रयाला कलानगर परिसरातच *’मातोश्री’* जवळच होते. या काळात बाळासाहेब व शिवसेना प्रचंड भरात होती. त्यामुळे त्यांचं आकर्षण होतच. पण कलेचा विद्यार्थी म्हणुन बाळासाहेबांच्या व्यंगचित्रकलेचा जास्तच चाहता होतो. आम्ही जे.जे.चे वसतीगृहातील विद्यार्थी दरवर्षी गणेशोत्सव साजरा करायचो. आमचेच कला प्रदर्शन मांडून नामवंत कलाकारांना त्यासाठी निमंत्रण द्यायचो. ती मंडळी येऊन आम्हाला मार्गदर्शन करायची. त्यावर्षी आम्ही बाळासाहेबांना बोलवायचं ठरवलं. आम्ही विद्यार्थीच मातोश्रीवर गेलो. त्यांची भेट घेतली. त्यांनी लगेचच होकार दिला. कार्यक्रमाचे दिवशी आम्ही तीन चार जण त्यांना घ्यायला गेलो. गाडी काढण्याऐवजी त्यांनी आमचं वसतीगृह जवळच असल्याने पायीच जाऊ असं सांगितलं. त्याकाळी बाळासाहेबांभोवती सुरक्षा यंत्रणेचा मोठा गराडा नव्हता. बाळासाहेब, निवडक शिवसैनिक, एक दोन पोलिस व आम्ही कार्यक्रम स्थळी आलो. बाळासाहेबांनी आमच्या कलाकृती बारकाईने पाहून कौतुक केले. *वसतीगृहाच्या पोर्चमध्येच आम्हाला कलेचे धडे देत त्यांनी व्यंगचित्रकलेचा लाईव डेमोही दाखवला.* रेषा काढतानाची त्यांची हातोटी पाहून आम्ही थक्क झालो. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे व्यंगचित्र काढले. त्यावेळी इंदिरा गांधी यांना काही मंत्री त्रासदायक ठरत होते. *बाळासाहेबांनी इंदिराजींचे नाक जरा जास्तच मोठं करून त्यावर त्यांना त्रास देणारे ९ मंत्री दाखवले. या व्यंगचित्राला समर्पक कॅप्शन लिहिलं…’नाकी नऊ आणलं’*
आजही ते व्यंगचित्र स्मरणात आहे.

रेषांवर, शब्दांवर इतकी हुकूमत असलेले ते कलाकार होते.
त्यांच्या भेटीचा आणखी एक प्रसंग पुढे १० वर्षांनी नगरमध्ये आला. बाळासाहेब तोपर्यंत हिंदूहृदयसम्राट बनले होते. नगरमध्ये वाडिया पार्क मैदानावर त्यांची विराट सभा आयोजित करण्यात आली होती. शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सभेची तयारी केली. मैदानात उंच स्टेज बांधून फुलांच्या सजावटीचा बॅकड्राॅप करण्यात आला होता. पण ही सजावट तितकी उठावदार झाली नसल्यानं शिवसेनेचे नगरमधील नेते अनिल राठोड यांनी मला बोलावून घेतले. मी वाडिया पार्क वर गेलो. *स्टेज पाहिल्यावर मी सांगितलें की, बॅकड्राॅपला २५ फुट उंचीचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य पेंटिंग काढू.* सभेला चोवीस तास राहीले होते. राठोड मला म्हणाले, एवढं मोठं पेंटिंग सभेपूर्वी पूर्ण होईल का? मी त्यांना विश्र्वास दिला. फक्त मला लागेल ती सामग्री द्या , असं सांगितलं. *मंडपवाल्यांनी मला २५ बाय १६ फुटांची कापड लावलेली दणकट फ्रेम तयार करून दिली. सायंकाळी ७.३० या मी काम सुरू केले. रात्रभर जागून मी सकाळी १० वाजेपर्यंत पेंटिंग पूर्ण केले.* ते वाडिया पार्क मध्ये नेऊन स्टेजवर लावण्यात आले. सगळे आश्र्चर्यचकित झाले. त्याकाळी फ्लेक्स वगैरे तंत्रज्ञान अस्तित्वातही नव्हते. ते भव्य चित्र सभेचं आणखी एक आकर्षण ठरलं. मी प्रचंड दमलो होतो. त्यामुळे चित्र लावून होताच घरी येऊन झोपलो. लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत ती ऐतिहासिक सभा झाली. सभेनंतर काही शिवसैनिक माझ्या घरी आले. मला उठवले व आय.बी.वर साहेबांनी भेटायला बोलावले आहे असं सांगितलं. स्वत: बाळासाहेबांचाच आदेश असल्याने मी लगेचच तयार होऊन त्यांच्या बरोबर गेलो. तिथे *बाळासाहेबांनी मला जवळ बोलावून पाठीवर शाबासकीची थाप दिली. माझी आस्थेनं चौकशी केली. महाराजांचं इतकं भव्य व देखणं पेंटिंग पाहून ते खूप आनंदी झाल्याचं दिसून आलं.* इतक्या व्यस्त वेळापत्रकातही त्यांनी माझ्या कलेची दखल घेतली व मला बोलावून घेतले. मला त्यांच्यातील हे कलासक्त व्यक्तिमत्व खूप भावलं. एका दिग्गज कलाकाराने पाठ थोपटल्याने माझ्या अंगावरही मूठभर मांस नक्कीच चढलं. नंतर सभेचा वृत्तांत अनिलभैयांकडून कळला. बाळासाहेब जेव्हा स्टेजवर आले तेव्हा महाराजांचं भव्य पेंटिंग पाहुन ते काही क्षण थबकले होते. नगरसारख्या छोट्या शहरात असं काम करणारा कलाकार कोण आहे याची विचारणा त्यांनी केली. तसेच सभा संपल्यानंतर त्या कलाकाराला भेटायचं असंही सांगून ठेवले. बाळासाहेबांच्या आदेशानुसार शिवसैनिक मला घ्यायला घरी आले. अशा रितीने माझी बाळासाहेबांशी दुसर्यांदा भेट झाली. आयुष्यातील अविस्मरणीय असे हे दोन प्रसंग माझ्या कलासाधनेचे फलित आहे असंच मला वाटतं. १९९० सालच्या त्या सभेचं बाळासाहेबांचे छायाचित्र व नंतर आमच्या भेटीच छायाचित्र आजही माझ्या संग्रहात आहे.
*माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!*

 

हेही वाचा:*बेस्टचा कोरोना गावागावात पोहोचला, एसटीचे कर्मचारी होताहेत बाधित*

 

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close