राहुरी विद्यापीठ
ड्रोनचा वापर कसा करता येऊ शकतो : ड्रोनचा उपयोग पिकांवर फक्त औषध फवारणीसाठीच नसून नैसर्गिक साधनसंपत्ती, वने, आरोग्य सेवा, दळणवळण, दुर्गम भागातील सर्वेक्षण यासाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचबरोबर ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठीही व मदत कार्य करण्यासाठी होत आहे. ड्रोन मॅपींग तंत्रज्ञानामुळे कमी कालावधीत व अधिक अचुक विविध कामे होत आहेत. यामुळे ड्रोन हे सर्व क्षेत्रात प्रभावीपणे काम करणारे तंत्रज्ञान ठरत असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता व शिक्षण संचालक डॉ. दिलीप पवार यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या काटेकोर शेतीसाठी डिजीटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स आणि रिमोट पायलट प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे कॅडस्ट्रल सर्वेक्षण व मॅपींग या विषयावर दोन दिवसाचे प्रशिक्षण डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्रशिक्षण सभागृहात आयोजीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, हाळगांव कषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे, कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. मुकुंद शिंदे, कृषि शक्ती व अवजारे विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे व अमिटी इंजिनीअर्स आणि सर्वेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंजि. योगेश जाधव उपस्थित होते.
डॉ. गोरक्ष ससाणे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की सध्याचे युग हे डिजीटल तंत्रज्ञानाचे आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कास्ट प्रकल्पामध्ये ड्रोन तंत्रज्ञानावर महत्वाचे संशोधन झाले आहे. या ड्रोन मॅपींग तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यापीठाची विविध महाविद्यालये तसेच विविध संशोधन प्रकल्पांच्या जमिनींची हद्द, त्यांचे संरक्षण करण्यासाठी होऊ शकतो. यावेळी डॉ. मुकुंद शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व डॉ. सचिन नलावडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी घाडगे यांनी केले. सदर प्रशिक्षणात अमिटी इंजिनीअर्स व सर्वेअर, पुणे येथील तज्ञ प्रशिक्षक तसेच विद्यापीठातील डॉ. सुनील कदम मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षणाचे आयोजन सचिव डॉ. सचिन नलावडे, संयोजक डॉ. मुकुंद शिंदे तर सहसंयोजक म्हणुन डॉ. सुनील कदम हे काम पाहणार आहेत. या प्रशिक्षणासाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 30 प्राध्यापक व शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदवला आहे.