Wednesday, September 3, 2025
Homeजिल्हा बातमीराज्यासह जिल्हा विकासकामांमध्ये अग्रेसर राहण्यासाठी महसूल विभागाने समन्वयातून काम करावे – आमदार...

राज्यासह जिल्हा विकासकामांमध्ये अग्रेसर राहण्यासाठी महसूल विभागाने समन्वयातून काम करावे – आमदार संग्राम जगताप

अहिल्यानगर,

महसूल विभाग हा थेट जनतेच्या संपर्कात येणारा महत्त्वाचा विभाग असून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात या विभागाचा मोलाचा वाटा असतो. लोकसहभाग व लोकाभिमुखता हे प्रशासनाचे खरे बळ असून राज्यासह जिल्हा विकासकामांमध्ये‌ अग्रेसर राहण्यासाठी महसूल विभागाने अधिक समन्वयातून काम करावे, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले. महसूल विभाग हा जिल्हा प्रशासनाचा कणा असून प्रत्येक गावात शासनाचे प्रथम दर्शन घडवतो. अधिकारी – कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता प्रशासनाच्या विश्वासार्हतेचे प्रतीक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सप्ताह २०२५ व महसूल दिनानिमित्त अधिकारी-कर्मचारी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्रकुमार पाटील, प्रभारी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जितेंद्र भिंगारदिवे आदी उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले, विकास प्रक्रियेमध्ये महसूल विभागाचा मोठा वाटा आहे. विभागाच्या योजनांबरोबर इतर विभागांच्या योजना व शासनाचे महत्त्वाचे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात महसूल विभाग महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतो. कोविडसारख्या महाभयंकर आपत्तीवरही महसूल विभागाने दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे आपण ती परिस्थिती लीलया पार केली. प्रत्येक शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विभागाशी प्रामाणिक राहून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशी अपेक्षा आमदार जगताप यांनी व्यक्त केली. तसेच पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, महसूल विभाग हा शासन व जनतेमधील महत्त्वाचा दुवा आहे. ब्रिटीश काळापासून या विभागाचे महत्त्व अधोरेखित होत आले आहे. केवळ महसूल संकलन करणाऱ्या विभागापासून आज या विभागाकडे शासनाच्या अनेक योजनांची अंमलबजावणी, आपत्ती व्यवस्थापन, निवडणुका, जमिनीचे वाटप यांसारख्या जबाबदाऱ्या आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य महसूल विभागाद्वारे केले जाते.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना त्यांनी इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे सांगितले. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमानुसार काम करावे. प्रशासन चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, तर चुकीचे काम करणाऱ्यांना शिक्षा केली जाईल, असेही ते म्हणाले. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून आगामी निवडणुकांमध्येही अशीच कामगिरी अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताह राबवण्यात येत आहे. या सप्ताहात रस्त्यावरील अतिक्रमणे हटवणे, घरकुल लाभार्थ्यांना जागांचे वाटप, नोंदी अद्ययावत करणे आदी कामे प्रभावीपणे पार पाडावीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून सर्वसामान्यांशी थेट संपर्कात असलेला विभाग आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभाग प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, विकासकामांमध्ये आपला जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे हे शक्य झाले असून पुढेही हे सातत्य टिकवून सर्वसामान्यांसाठी अविरतपणे काम व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमात सन २०२३, २०२४ व २०२५ या तीन वर्षांत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपविभागीय अधिकारी किरण पाटील यांनी प्रास्ताविक करून महसूल सप्ताहाची उद्दिष्टे व पार्श्वभूमी स्पष्ट केली. सूत्रसंचालन नायब तहसीलदार संध्या देठे यांनी केले, तर आभार उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी मानले.

कार्यक्रमास महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments