कृषीवार्ताताज्या घडामोडी

नाशिक ते दिल्ली वाहन जत्थ्यासह हजारो शेतकरी देणार दिल्लीला धडक

किसान सभेचा २१ डिसेंबर रोजी चलो दिल्लीचा नारा

शेअर करा

 

किसान सभेचा २१ डिसेंबर रोजी चलो दिल्लीचा नारा !

नाशिक ते दिल्ली वाहन जत्थ्यासह हजारो शेतकरी देणार दिल्लीला धडक !

अहमदनगर दि 18 डिसेंबर,प्रतिनिधी

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात महाराष्ट्रातील हजारो शेतकरी थेट दिल्लीत जाऊन सामील होणार आहेत.
अशी माहिती किसान सभेचे डॉ.अजित नवले यांनी दिली.
अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली २१ डिसेंबर २०२० रोजी नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्राचे हे हजारो शेतकरी दिल्लीच्या रणसंग्रामात सामील होण्यासाठी निघतील. शेकडो वाहनांमधून हजारो शेतकरी १२६६ किलोमीटरचा प्रवास करून २४ डिसेंबर २०२० रोजी दिल्ली येथील बॉर्डरवर पोहोचतील. दिल्लीला विविध राज्यांना जोडणारे प्रमुख महामार्ग शेतकऱ्यांनी अगोदरच ब्लॉक केले आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी राजस्थान हरियाणा सीमेवर शहाजहानपूर येथे दिल्लीकडे जाणारा महामार्ग रोखत आंदोलनात सामील होतील. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान व दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांमधून आलेल्या शेतकऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आपले रेशन, पाणी, स्वयंपाक व निवासाची व्यवस्था सोबत घेऊन बेमुदत मुक्कामाच्या तयारीने दिल्लीला जातील.

हेही वाचा:प्लायवूडच्या गोदामात स्फोट एक जण ठार

किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी राज्य अध्यक्ष व माजी आमदार जे. पी. गावीत, राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, राज्य सहसचिव सुनील मालुसरे आणि सीटूचे राज्य अध्यक्ष व केंद्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला.

दिल्ली येथील आंदोलनात दिल्लीच्या आजूबाजूची राज्ये प्रामुख्याने सामील झाली आहेत. ३ डिसेंबरच्या देशव्यापी निदर्शनांमध्ये व ८ डिसेंबरच्या भारत बंद मध्ये देशभरातील इतर राज्यांमधील जनतेने आंदोलनाला प्रचंड पाठिंबा दिला असला तरी दिल्लीपासून दूर असलेल्या राज्यांमधील शेतकरी अद्याप प्रत्यक्ष दिल्लीत जाऊन मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊ शकले नव्हते. रेल्वेची सामान्य वाहतूक बंद असल्याने इच्छा असूनही शेतकरी दिल्लीला जाऊ शकले नव्हते. आता दिल्लीपासून दूर असूनही वाहतुकीच्या या अडचणीवर वाहन जत्था काढून मात करत हजारोंच्या संख्येने दिल्ली गाठणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरत आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या या लढाऊ कृतीनंतर इतर राज्यातील शेतकरीही वाहन जथ्थे काढत दिल्लीच्या दिशेने कूच करतील असा विश्वास किसान सभा व्यक्त करत आहे.

महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमधील शेतकरी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जमतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुपारी 1 वाजता दिल्लीच्या दिशेने निघतील. मोदी सरकार कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी कृषी कायदे आणत असल्याने ही लढाई केंद्र सरकार व त्यांचे कॉर्पोरेट भागीदार यांच्या विरोधात असल्याने वाहन जत्था दिल्लीला प्रस्थान करण्यापूर्वी नाशिक येथील रिलायन्स पेट्रोल पंपावर जोरदार निदर्शने करण्यात येतील.

महाराष्ट्रातील सर्व समविचारी संघटनांचा या चलो दिल्ली मोहिमेला पाठिंबा असणार आहे. दिनांक २२ डिसेंबर रोजी दुपारी वाहन जत्था धुळे येथे पोहचल्यावर राज्यभरातील सर्व समविचारी शेतकरी, कामगार व श्रमिक संघटनांच्या वतीने धुळे येथे पाठिंबा सभा घेण्यात येईल. जनआंदोलनांच्या संघर्ष समितीतील विविध संघटना 22 डिसेंबरला दुपारी 3 वाजता धुळे येथे होणाऱ्या मोठ्या जाहीर सभेत दिल्लीत जाणाऱ्या शेतकऱ्यांना आपला पाठिंबा व्यक्त करतील. तसेच ओझर, पिंपळगाव बसवंत, चांदवड, उमराणे, मालेगाव आणि शिरपूर येथेही जनतेच्या वतीने जथ्याचे जंगी स्वागत केले जाईल.

केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत, शेतकरी विरोधी प्रस्तावित वीजबिल विधेयक मागे घ्यावे व शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट आधार भावाचे संरक्षण मिळावे यासाठी केंद्रीय कायदा करावा अशी मागणी किसान सभा करत आहे. शेतकऱ्यांच्या या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाला आणखी व्यापक करत तीव्र करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या ऐतिहासिक चलो दिल्ली आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभा करत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close