मुंबई दि.८ –
“राज्यबोर्डासह अन्य सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन व अध्यापन करणे हे अनिवार्य असून राज्यगीत गायन सुद्धा केले जावे “,असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आजच्या बैठकीत केले.
आज दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी मंत्रालयीन दालनात सर्व बोर्डाच्या समन्वयक, प्राचार्य व शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्या सहविचार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्छिंद्र प्रताप सिंह , राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे राहूल रेखावार, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन,कक्ष अधिकारी मृणाली काटेंगे, मुंबई विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ, शिक्षण निरीक्षक वैशाली वीर यांच्यासह सीबीएसई, आयसीएसई, इंटरनॅशनल बोर्डाचे विविध समन्वयक व बोर्डाच्या शाळांचे प्राचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.
शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे पुढे म्हणाले की ICSE, CBSE, Cambridge बोर्डातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या इयत्ता दहावीच्या गुणपत्रिकेवरवर सुद्धा मराठी हा विषय आला पाहिजे. त्या साठी विविध बोर्डाशी पत्रव्यवहार केला जाईल.स्टेट बोर्डाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभ्यासक्रमाचा ICSE बोर्डाच्या पुस्तकामध्येही समावेश झाला पाहिजे.
IB बोर्ड मध्ये मानव्यविद्या या विषयांमध्ये महाराष्ट्राचा इतिहास शिकवण्याबाबतही विचार केला जावा. दिव्यांग विद्यार्थी, कमी अध्ययन क्षमता असणारे विद्यार्थी यांचाही सर्व समावेशक शिक्षणात समावेश केला जावा.CCTV सर्व शाळांमध्ये बसवले जावेत. शिक्षण हक्क अधिनियम अंतर्गत अन्य बोर्डाच्या शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रवेशाची काटेकोर अंमलबजावणी केली जावी. शालेय शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची अन्य बोर्डाच्या शाळांमध्येही प्रभावी अंमलबजावणी केली जावी. राष्ट्र प्रथम ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जावी. एक पेड माँ के नाम या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. उत्तम सुविधा असणाऱ्या अन्य बोर्डाच्या शाळांनी मराठी माध्यमाच्या शाळानाही मार्गदर्शन करावे.
सर्व बोर्डाच्या समन्वयक, प्राचार्य यांनी यावेळी अन्य बोर्डाच्या शाळांमध्ये सुरू असलेले विविध उपक्रम, अध्ययन अध्यापनाचे प्रयोग ,मूल्यमापन पद्धती या विषयी माहिती दिली.