*भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार सुप्रसिध्द ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांना आज औरंगाबादेत प्रदान*
*भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार सुप्रसिध्द ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांना आज औरंगाबादेत प्रदान*

 

अंबाजोगाई दि १८ सप्टेंबर प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण स्मृती समिती, अंबाजोगाईच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा राज्य पातळीवरील या वर्षीचा भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार सुप्रसिध्द ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रावसाहेब उर्फ रा. रं. बोराडे यांना आज औरंगाबादेत प्रदान केला जाणार आहे.

पूर्वी अंबाजोगाई येथे तो प्रा. रंगनाथ तिवारी यांच्या हस्ते दिला जाणार होता पण ऐन वेळी प्राचार्य बोराडे सर यांची तब्बेत  बरी नसल्याने त्यांना डॉक्टरानी प्रवास करण्यास मनाई केल्याने मुळे व कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा कार्यक्रम औरंगाबाद येथे करण्यात येणार आहे. जेष्ठ लेखक, प्रकाशक व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली आहे.

अंबाजोगाईच्या राजकारण, समाजकारण, साहित्य, संगीत, लोककला, सांस्कृतीक चळवळ, पत्रकारिता, सहकार शिक्षण क्षेत्रात ज्यांनी आपले योगदान देऊन अंबाजोगाईच्या इतिहासात आपले सुवर्णपान लिहिले असे भगवानरावजी लोमटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा पुरस्कार २०१३ या वर्षी पासून सुरू केला. सुसंस्कृत राजकारणी. साहित्यिक, संगीत गायक व रचनाकार, पत्रकार, नाट्य व चित्रपट अभिनय, सहकार, क्रीडा व कृषी या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीस महाराष्ट्र पातळीवर हा पुरस्कार दिला जातो.

 

 हेही वाचा :लिम्बोडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला ;कड्याचा पाणीप्रश्न सुटला

यापूर्वी यशवंतराव गडाख-पाटील, विजय कुवळेकर , पद्मश्री ना.धों. महानोर , रामदास फुटाणे , पं नाथराव नेरळकर , विजय कोलते व मधुकर भावे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या वर्षीचा हा आठवा पुरस्कार प्राचार्य रा. रं. बोराडे यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह, यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमा, सन्मानपत्र, रोख २५ हजार रुपये, शाल, पुष्पगुच्छ असे आहे.

 

प्राचार्य बोराडे सरांचे एकूण पंधरा कथासंग्रह,
बारा कादंबऱ्या, बारा नाटके व एकांकिका प्रसिद्ध झाल्या आहेत. वगनाट्य व पथनाट्य पण त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या या लिखाणात जशी गंभीरता आहे तशी विनोदीशैली हे खास वैशिष्ठ्ये आहे. २००० ते २००४ पर्यंत ते महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते. मराठवाडा शिक्षण मंडळातील अनेक महाविद्यालयात प्राचार्य म्हणून नावलौकिक मिळविला आहे. महाराष्ट्र शासन, साहित्य संस्थांचे अनेक प्रतिष्ठितपुरस्कार त्यांना प्राप्त झाले. यशवंतराव चव्हाण स्मृती समिती अंबाजोगाईचा यशवंतराव चव्हाण स्मृती साहित्य पुरस्कार, अंबाजोगाई त्यांना देण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या श्रोत्यांच्या उपस्थित औरंगाबादेतील ‘शिवार’ या त्यांच्या निवास स्थानी देण्यात येणार आहे.

 

Share this story