Friday, September 5, 2025
Homeप्रादेशिक बातमीअरणमध्ये रंगला 'श्रीफळहंडी'चा सोहळा, संत सावता माळींची पुण्यतिथी उत्सहात साजरी

अरणमध्ये रंगला ‘श्रीफळहंडी’चा सोहळा, संत सावता माळींची पुण्यतिथी उत्सहात साजरी

सोलापूर
solapur aran news श्री क्षेत्र अरण (ता. माढा) येथे संत शिरोमणी सावता महाराजांचा ७३० वा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त तुकाराम महाराज यांचे वंशज बाळासाहेब देहुकर महाराज यांच्या हस्ते श्रीफळ हंडी फोडण्यात आली.हजारो भक्तांच्या साक्षीने पारंपारिक श्रीफळ हंडीचा सोहळा उत्साहात पार पडला.

या सोहळ्याला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अभिजीत पाटील, माजी सभापती भारत शिंदे, माजी सभापती शिवाजी कांबळे, रमेश बारसकर,सावता परिषदेचे कल्याणराव आखाडे, मृदुल माळी उपस्थित होते.

ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष, टाळ मृदंगाचा गजर आणि वारकऱ्यांच्या उत्साहात श्रीफळ हंडी सोहळा चांगलाच रंगला.सुमारे अर्धा तास चाललेला हा नयनरम्य सोहळा उपस्थितानी याची देहा याची डोळा पाहिला. श्रीक्षेत्र अरण या ठिकाणी सुमारे पाच हजार श्रीफळांची हंडी बांधलेली असते.गिड्डे यांच्या या मानकऱ्यांच्या घरून समारंभपूर्वक हंडी आणून पारावर बांधली गेली. ती हंडी फोडून हा सोहळा पार पडतो.

पांडुरंगाच्या पालखीचा फडाचा मान आजरेकर परिवार यांचा आहे. संत तुकाराम महाराजांचे वंशज देहूकर कुंटूंबातील बापूसाहेब देहूकर,बाळासाहेब देहूकर,कान्होबा देहूकर यांनी श्रीफळ हंडी फोडली. अरण (ता. माढा) येथील संत सावता महाराज संजीवन समाधी मंदिरासमोर हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

बुधवारी दुपारी बारा वाजता श्री विठ्ठल आणि संत सावता महाराज यांच्या पालखीची भेट संजीवन समाधी मंदिर येथे झाली. पुष्पवृष्टी नंतर महाआरती झाली. श्री विठ्ठल पालखीचे अरण शिवारात वाजत गाजत स्वागत झाले. अश्वपूजन करुन जागोजागी रांगोळी, फटाक्यांची आतषबाजी झाली. यावेळी संत सावता माळी महाराज पालखीसमोर देहूकर मंडळींचे किर्तन झाले तर विठ्ठलाच्या पालखीसमोर अरण व परिसरातील भजनी मंडळाने भजन गायले.

विठ्ठलभक्तांनी अरण येथे सावता महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. महाराष्ट्रातून शेकडो दिंड्या, पालख्यांचा वैष्णव मेळावा पंढरपुरात हजेरी लावत असतो; परंतु कर्मयोगी सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याला प्रत्यक्ष परमात्मा धावून आल्याने सावता महाराजांनी पेरलेला भक्तीचा मळा भाविकांनी फुलून जातो.श्रीफळ हंडीचा सोहळा डोळ्यात साठवून भाविक धन्य झाले.

भक्तांनी व वारकऱ्यांनी वाहिलेले नारळ बांधून ही श्रीफळ हंडी तयार करण्यात येते आणि हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा नयनरम्य श्रीफळ हंडी सोहळा श्री संत सावता माळी महाराज यांच्या अरण भूमीत साजरा केला.यावेळी श्रीफळहंडीचे नारळ प्रसाद म्हणून मिळविण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments