गडचिरोली
The police recovered the explosives hidden by the Naxalites भामरागड तालुक्यातील कवंडे येथील जंगलात नक्षल्यांनी जमिनीत पुरुन ठेवलेली स्फोटके हुडकून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. यामुळे पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा डाव फसला.
कवंडे हे गाव भामरागड तालुक्यातील शेवटचे गाव असून, ते छत्तीसगड सीमेवर आहे. ९ मार्चला गडचिरोली पोलिस दलाने तेथे पोलिस ठाण्याची उभारणी केली. त्यानंतर आज कवंडे येथील पोलिस ठाण्यातील विशेष अभियान पथकाचे जवान परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना पोलिस मदत केंद्रापासून दक्षिणेला शंभर मीटर अंतरावर जंगलातील पायवाटेवर पोलिसांना एक भरमार बंदूक आढळली.
शेजारच्या जागेत काहीतरी संशयास्पद असल्याचा संशय आला. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या जवानांनी अत्याधुनिक उपकरणाद्वारे त्या जागेची तपासणी केली असता जमिनीत दीड ते दोन फूट खोल स्फोटके दडवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी ही स्फोटके शिताफीने बाहेर काढून ती नष्ट केली. यामुळे पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा डाव उधळून लावला गेला.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, एम.रमेश, सत्यसाई कार्तिक, उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनात कवंडे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मंदार शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.