*सरकारला जाब विचारावा-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांची राज्यपालांकडे मागणी*
*सरकारला जाब विचारावा-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांची राज्यपालांकडे मागणी*

 

मुंबई ,दि 28 ,टीम सीएमन्यूज

राज्यात अघोषित आणिबाणी सदश परिस्थिती निर्माण करून पत्रकार-संपादकांमध्ये दहशत निर्माण केली जात असून आणि त्याबाबत राज्य सरकारला जाब विचारावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे .
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे कि,
राज्यात अघोषित आणिबाणीसदृश आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून,
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करून त्यांच्यात प्रचंड दहशतीचे
वातावरण निर्माण केले जात आहे. कुणी आपल्या विरोधात बोलूच नये, अशी स्थिती निर्माण केली जात आहे.
आपल्याला विदित असेलच की, वाधवान प्रकरणात एबीपी माझाचे पत्रकार श्री राहल कुळकर्णी यांनी सरकारने दिलेले पत्र सार्वजनिक केल्याच्या काही दिवसांतच वांद्र्यातील गर्दींचा ठपका त्यांच्यावर ठेऊन त्यांना अटक करण्यात आली. मुंबईत हा गुन्हा नोंदविण्यात आला असल्याने त्यांना अनेक संवेदनशील क्षेत्रातून प्रवास करून उस्मानाबाद येथून मुंबईत आणण्यात आले.
त्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर हा संपूर्ण प्रसंग त्यांनी स्वत:च कथन केला आहे.
त्यानंतर ‘टाईम्स नाऊ’ या राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या संपादकांना थेट एफआयआर दाखल करण्याची
आणि चौकशी करण्याची धमकी स्वत: राज्याच्या गृहमंत्र्यांनी पत्र पाठवून दिली. वस्तुत: एखाद वृत्त प्रतिकूल असेल तर त्याचा खुलासा करता येऊ शकतो. पण, असे न करता थेट धमक्या देणे,गुन्हे दाखल करणे, अटक करणे, चौकशीचा ससेमिरा लावण्याची दहशत दाखविणे, असे प्रकार सर्रास केले जात आहेत.
काल दि. २७ एप्रिल २०२० रोजी तर आणखी धक्कादायक घटना घडली. रिपब्लिक टीव्हीचे
संपादक श्री अर्णव गोस्वामी यांना साडेबारा तास चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. टीव्हीवरील एका चर्चात्मक कार्यक्रमाची चौकशी करण्यासाठी १२.३० तास बसवून ठेवणे, यातून केवळ पत्रकारांच्या मनात दहशत निर्माण करणे, हा एकमेव हेतू दिसून येतो. अनेक गंभीर गुन्ह्यांत सुद्धा आरोपींची अशी चौकशी करण्याचे धाडस हे सरकार दाखवू शकले नाही. पण, श्री अर्णव गोस्वामी यांची सलग आणि न थांबता ही चौकशी करण्यात आली. याबाबतचा घटनाक्रम सुद्धा ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्याच्या बाहेर स्वत: श्री अर्णव गोस्वामी यांनी विदित केला.
सोशल मिडियात सरकारविरोधात लिखाण करणाऱ्यांची सुद्धा मुस्कटदाबी केली जात आहे.
त्यांच्यावर सुद्धा मोठ्याप्रमाणात गुन्हे दाखल करण्याचे प्रकार राज्यभर सर्वत्र सुरू आहेत.
दुसरीकडे वृत्तपत्र वितरण सुरक्षित असल्याचे जागतिक आरोग्य संघटना आणि तत्सम संस्थांनी सांगितले असतानाही वृत्तपत्र वितरणावर बंदी टाकण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने सुद्धा आता याबाबत राज्य सरकारला जाब विचारला आहे. एकूणच हे प्रकार निष्पक्ष माध्यमांच्या अस्तित्त्वावरच घाला घालणारे आहेत. लोकशाही धोक्यात आणणारे आहेत आणि म्हणून अघोषित आणिबाणीसदृश आहेत. या सर्व घटनांची अतिशय गंभीर दखल घेत, याबद्दल राज्य सरकारला जाब विचारावा, अशी मागणी या पत्राद्वारे करीत असल्याचे म्हटले आहे .

Share this story