*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासियांना पत्र वाचा*
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासियांना पत्र वाचा*

 

नवी दिल्ली दि 30 मे टीम सीएमन्यूज
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधून पत्र लिहले आहे .

माझे प्रिय स्नेहीजन,

एक वर्षांपूर्वी भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक नवीन सोनेरी अध्याय जोडला गेला. देशात अनेक दशकांनंतर पूर्ण बहुमताच्या एखाद्या सरकारला सलग दुसऱ्यांदा जनतेने जबाबदारी सोपवली होती. हा अध्याय रचण्यात तुमची खूप मोठी भूमिका होती. म्हणूनच आजचा हा दिवस तुम्हाला वंदन करण्याची, भारत आणि भारतीय लोकशाही प्रति तुमच्या या निष्ठेला प्रणाम करण्याची माझ्यासाठी संधी आहे.

जर परिस्थिती सामान्य असती तर मला तुम्हाला भेटून तुमचे दर्शन घेण्याचे सौभाग्य लाभले असते. मात्र कोरोना या जागतिक महामारीमुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे , अशा परिस्थितीत या पत्राद्वारे तुमच्या चरणी नमन करायला आणि तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे.

मागील वर्षात तुमचा स्नेह, शुभ आशीर्वाद आणि तुमच्या सक्रिय सहकार्याने मला कायम एक नवी ऊर्जा, नवी प्रेरणा दिली आहे. या काळात तुम्ही लोकशाहीच्या ज्या सामूहिक ताकदीचे दर्शन घडवलेत ती आज संपूर्ण जगासाठी एक उदाहरण बनली आहे.

वर्ष 2014 मध्ये तुम्ही, देशातील जनतेने देशात एक मोठे परिवर्तन आणण्यासाठी मतदान केले होते, देशाची धोरणे आणि पद्धती बदलण्यासाठी मतदान केले होते. त्या पाच वर्षात देशाने व्यवस्थांना निष्क्रियता आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीतून बाहेर पडताना पाहिले आहे. त्या पाच वर्षात देशाने अंत्योदय भावनेसह गरीबांचे जीवन सुलभ बनवण्यासाठी प्रशासन परिवर्तित होताना पाहिले आहे.

त्या कार्यकाळात जगात भारताची आन-बान-शान तर वाढलीच, त्याचबरोबर आम्ही गरीबांची बँक खाती उघडली, त्यांना मोफत गॅस जोडणी, मोफत वीज जोडणी दिली, शौचालये,  घरे बांधून गरीबांची प्रतिष्ठा देखील वाढवली.

त्या कार्यकाळात सर्जिकल हल्ला झाला, हवाई हल्ला झाला, तसंच आम्ही एक पद एक निवृत्तीवेतन, एक देश एक कर – GST, शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या किमान हमी भावाच्या मागण्या देखील पूर्ण करण्याचे काम केले.

तो कार्यकाळ देशाच्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी समर्पित होता.

वर्ष 2019 मध्ये तुमचा आशीर्वाद, देशाच्या जनतेचा आशीर्वाद, देशाच्या भव्य स्वप्नांसाठी होता , आशा-आकांक्षाच्या पूर्ततेसाठी होता. आणि या एक वर्षात घेण्यात आलेले निर्णय याच भव्य स्वप्नांची झेप आहे.

आज जन-जन शी निगडित जनामनाची जनशक्ति, राष्ट्रशक्तिची चेतना प्रज्वलित करत आहे.मागील एका वर्षात देशाने कायम नवी स्वप्ने पाहिली, नवीन संकल्प केले, आणि हे संकल्प सिद्धीला नेण्यासाठी निरंतर  निर्णय घेत पावले देखील उचलली.

भारताच्या या ऐतिहासिक प्रवासात देशातील प्रत्येक समाज, प्रत्येक  वर्ग आणि प्रत्येक व्यक्तिने उत्तम प्रकारे आपली जबाबदारी पार पाडली आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा मंत्र घेऊन आज देश सामाजिक असो, आर्थिक असो, जागतिक असो किंवा आंतरिक, सर्वच दिशांनी पुढे वाटचाल करत आहे.

प्रिय स्नेहीजन,

गेल्या एक वर्षात काही महत्वपूर्ण निर्णय अधिक चर्चेत राहिले आणि त्यामुळेच ते यश आठवणीत राहणे अगदी स्वाभाविक आहे.

राष्ट्रीय एकता-अखंडतेसाठी कलम  370 असेल, अनेक तपांच्या जुन्या संघर्षाचा सुखद परिणाम – राम मंदिर बांधायला परवानगी असेल, आधुनिक समाज व्यवस्थेत अडथळा बनलेला तीन तलाक असेल, किंवा मग भारताच्या करुणेचे प्रतीक नागरिकत्व सुधारणा कायदा असेल, ही सर्व कामगिरी तुमच्याही स्मरणात आहे.

एकापाठोपाठ  एक झालेल्या या ऐतिहासिक निर्णयांमध्ये अनेक निर्णय, अनेक बदल असेही आहेत ज्यांनी भारताच्या विकास यात्रेला नवी गती दिली आहे , नवी उद्दिष्टे दिली आहेत , लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.

संरक्षण दल प्रमुख हे पद निर्माण केल्यामुळे सैन्यात समन्वय वाढला आहे तसेच गगनयान अभियानाच्या तयारीसाठीसुद्धा भारताने वेग वाढवला आहे.

यादरम्यान गरीब, शेतकरी,  महिला-युवा यांचे सक्षमीकरण करण्याला आम्ही प्राथमिकता दिली आहे.

आता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत प्रत्येक शेतकऱ्याचा समावेश झाला आहे.

गेल्या वर्षभरात या योजनेअंतर्गत 9 कोटी 50 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 72 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे.

देशातील 15 कोटीपेक्षा जास्त ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी जल जीवन अभियान सुरु करण्यात आले आहे.

आमच्या 50 कोटीपेक्षा जास्त पशुधनाच्या चांगल्या आरोग्यासाठी मोफत लसीकरणाचे व्यापक प्रमाणावर अभियान राबविण्यात येत आहे.

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी, शेतमजूर, छोटे दुकानदार आणि असंघटित क्षेत्रातील श्रमिक या सर्वांसाठी वयाच्या साठीनंतर नियमितपणे मासिक 3 हज़ार रुपए निवृत्तीवेतन देण्याची सोय सुनिश्चित करण्यात आली आहे.

मच्छीमारांची सवलत वाढविण्यासाठी त्यांना मिळणाऱ्या सुविधा वाढविणे आणि सागरी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी विशेष योजनांबरोबरच वेगळा विभागही बनविण्यात आला आहे. याचबरोबरीने व्यापाऱ्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी व्यापारी कल्याण मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वयंसहायता बचत गटातील सुमारे 7 कोटी भगिनींना आता जास्तीची आर्थिक मदत देण्यात येत आहे. नुकतेच बचत गटांसाठी विनाहमी कर्जाची मर्यादा 10 लाखावरून दुप्पट म्हणजे 20 लाख रुपये करण्यात आली आहे.

आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा विचार करून देशात 450 हून जास्त नवीन एकलव्य पद्धतीच्या निवासी शाळांच्या निर्मितीचे अभियान सुरु करण्यात आले आहे.

सर्वसामान्यांच्या हिताशी निगडित चांगले कायदे तयार होण्यासाठीसुद्धा गेल्या वर्षभरात अतिशय वेगाने कार्य झाले आहे. आमच्या संसदेने तिच्या कामकाजाद्वारे दशकांपूर्वीचा उच्चांक तोडला आहे.

याचाच परिणाम म्हणून ग्राहक संरक्षण कायदा असेल, चिटफंड कायद्यातील सुधारणा असेल; दिव्यांग, महिला आणि मुलांसाठी अधिक संरक्षण देणारे कायदे असतील हे सर्व जलदगतीने बनू शकले आहेत.

सरकारची धोरणे आणि निर्णयांमुळे शहरे आणि गावातील दरी कमी होत आहे. पहिल्यांदाच असे झाले आहे कि गावात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या शहरात इंटरनेट वापरणाऱ्यांपेक्षा 10 टक्के जास्त झाली आहे. देशहितासाठी केल्या गेलेल्या अशा प्रकारच्या ऐतिहासिक कार्य आणि निर्णयांची यादी खूप मोठी आहे. या पत्रात सर्वच विस्ताराने सांगणे शक्य होणार नाही. मात्र मी हे अवश्य सांगेन कि एक वर्षाच्या कार्यकाळात दररोज चोवीस तास पूर्ण सजगतेने काम झाले आहे, संवेदनशीलतेने काम झाले आहे आणि निर्णय घेतले गेले आहेत.

प्रिय स्नेहीजन

देशवासीयांच्या इच्छा- आकांक्षांच्या पूर्ततेसाठी आम्ही खूपच जलदगतीने मार्गक्रमण करीत होतो, तेव्हढ्यात कोरोना जागतिक महामारीने भारतालाही विळखा घातला.

एकीकडे अत्याधुनिक आरोग्यसेवा आणि विशाल अर्थव्यवस्था असलेल्या जगातील मोठ्या मोठ्या महासत्ता आहेत तर दुसरीकडे इतकी प्रचंड लोकसंख्या आणि अनेक आव्हानांनी ग्रासलेला आपला भारत देश आहे.

पुष्कळ लोकांनी शंका व्यक्त केली होती कि जेव्हा कोरोनाचा भारतावर हल्ला होईल तेव्हा भारत पूर्ण जगासाठी संकट ठरू शकतो.

परंतु आज सर्व देशवासीयांनी भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला आहे. तुम्ही हे सिद्ध केले आहे कि जगातील सामर्थ्यवान आणि संपन्न देशांच्या तुलनेत भारतीयांचे सामूहिक सामर्थ्य आणि क्षमता अभूतपूर्व आहे.

टाळ्या- थाळ्या वाजवून आणि दिवे प्रज्वलित करून तसेच सेनेकडून कोरोना योद्धयांचा सन्मान असेल, जनता कर्फ्यू असेल किंवा देशव्यापी टाळेबंदी दरम्यान नियमांचे निष्ठेने पालन असेल, या सर्व प्रसंगी तुम्ही दाखवून दिले आहे कि एक भारत हीच श्रेष्ठ भारताची हमी आहे.

निश्चितच इतक्या मोठ्या संकटात असा दावा कोणी करणार नाही कि कोणालाच काही त्रास किंवा गैरसोय झाली नाही. आमचे श्रमिक मित्र, प्रवासी कामगार बंधू-भगिनी, छोट्या-छोट्या उद्योगात काम करणारे कारागीर, स्थानकांवर सामान विकणारे, टपरी -हातगाडी लावणारे, आमचे दुकानदार बंधू-भगिनी, लघु उद्योजक अशा सहकार्यांनी अपरिमित यातना सोसल्या आहेत. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करीत आहोत.

मात्र आपण सामोरे जात असलेल्या असुविधांचे  आपल्या जीवनातल्या  संकटात रुपांतर होत नाही हे आपण सुनिश्चित केले पाहिजे. यासाठी प्रत्येक भारतीयाने प्रत्येक मार्गदर्शक तत्वाचे पालन करणे आवश्यक आहे. आपण आतापर्यंत धैर्य आणि संयमाचे दर्शन घडवले आहे तसेच पुढेही जारी ठेवायचे आहे.  इतर देशांच्या तुलनेत भारतात परिस्थिती ठीक आहे याचे हेही एक मोठे कारण आहे. ही लढाई प्रदीर्घ आहे मात्र आपण विजय पथावर वाटचाल करत आहोत आणि विजय प्राप्त करणे हा आपला सर्वांचा सामुहिक संकल्प आहे.

पश्चिम बंगाल आणि ओदिशामधे  नुकत्याच आलेल्या अम्फान चक्रीवादळात तिथल्या जनतेने ज्या हिमतीने परिस्थितीचा मुकाबला केला, चक्रीवादळाने होणाऱ्या  नुकसानाची तीव्रता कमी केली, ती आपणा सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा आहे.

प्रिय स्नेहीजन,

या परिस्थितीत आज भारतासहित सर्व देशांच्या अर्थव्यवस्था यातून कशा सावरतील ? यावरही व्यापक चर्चा होत आहेत. त्याचवेळी दुसरीकडे हा विश्वासही आहे की भारताने ज्याप्रमाणे कोरोनाविरोधातल्या लढ्यात आपल्या एकजुटीने संपूर्ण जगाला अचंबित केले त्याचप्रमाणे आपण आर्थिक क्षेत्रातही आपण नवे उदाहरण स्थापित करू. 130 कोटी भारतीय, आपल्या सामर्थ्याने आर्थिक क्षेत्रातही जगाला चकितच नव्हे तर प्रेरितही करू शकतात.

आपल्याला  स्व-सामर्थ्यावर उभे राहावेच  लागेल ही काळाची गरज आहे.आपल्या सामर्थ्यावर वाटचाल करावी लागेल आणि त्यासाठी एकमेव  मार्ग आहे तो म्हणजे – आत्मनिर्भर भारत.

आता नुकतेच आत्मनिर्भर भारत अभियानासाठी दिलेले 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज म्हणजे या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे.

हे अभियान, प्रत्येक देशवासियासाठी, आपले शेतकरी, आपले कामगार, आपले लघु उद्योजक, स्टार्ट अपशी जोडलेले आपले युवा, सर्वांसाठी नव्या संधी घेऊन येईल.

भारतीयांच्या परिश्रम आणि घाम गाळून केलेल्या मेहनतीने, त्यांच्या प्रतिभेतून निर्माण झालेल्या स्थानिक उत्पादनांच्या बळावर भारत आयातीवरचे आपले अवलंबित्व कमी करेल आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे वाटचाल करेल.

प्रिय स्न्हेहीजन,

गेल्या सहा वर्षातल्या वाटचालीत आपण माझ्यावर आपले आशीर्वाद अखंड ठेवले आहेत, आपला स्नेह वृद्धिंगत केला आहे. आपल्या आशीर्वादाच्या शक्तीनेच देश गेल्या एक वर्षात ऐतिहासिक निर्णय आणि विकासाच्या  अभूतपूर्व गतीने पुढे चालला आहे. मात्र अजूनही बरेच काही करायचे बाकी आहे हे मी जाणतो. देशासमोर अनेक आव्हाने आहेत,  समस्या आहेत.मी अखंड प्रयत्न करत आहे. माझ्यात काही  उणीव  असू शकते मात्र देशात काही उणीव नाही.  म्हणूनच माझा  तुमच्यावर स्वतः पेक्षा जास्त विश्वास आहे,  तुमची शक्ती, तुमच्या सामर्थ्यावर आहे.

माझ्या  संकल्पाची उर्जा आपणच आहात,  आपला पाठींबा, आपला आशीर्वाद,  आपला स्नेह आहे.

जागतिक महामारीमुळे, हा संकटाचा काळ तर आहेच मात्र आपणा देशवासीयांसाठी संकल्प करण्याचीही वेळ आहे.

कोणतीही आपत्ती 130 कोटी भारतीयांचा वर्तमान किंवा भविष्य काळ  निश्चित करू शकत नाही हे आपण कायम स्मरणात ठेवायचे आहे.

आपण आपला वर्तमान काळ आणि भविष्य काळही स्वतः च निश्चित करू.

आपण पुढे जात राहू, प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करत राहू, आपण विजयी होऊ.

आपल्याकडे म्हटले गेले आहे-

‘कृतम् मे दक्षिणे हस्ते, जयो मे सव्य आहितः’॥

म्हणजे आपल्या एका हातात कर्म आणि कर्तव्य आहे तर दुसऱ्या हातात यश सुनिश्चित आहे.

देशाच्या अखंड सफलतेच्या  कामनेसह मी आपणाला पुन्हा नमन करतो.

आपल्याला आणि आपल्या  कुटुंबाला माझ्या हार्दिक शुभेच्छा.

आरोग्यसंपन्न राहा,सुरक्षित राहा !!!

जागृत राहा, जागरूकता ठेवा !!!

आपला  प्रधानसेवक

नरेंद्र मोदी

Share this story