*मंत्री होणं सोपं आहे, पालक होणं नाही – पंकजाताईचा टोला*

 

मुंबई दि. १७ टीम सीएमन्यूज

ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे घरी पोचविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत आहे, ऊसतोड कामगार, त्यांच्या पत्नी, मुले यांच्याशी माझा दररोज संवाद आहे, अशा परिस्थितीत मी यात राजकारण करत आहे असं म्हणणारे बीड जिल्हयाचे पालकच असंवेदनशील आहेत, मंत्री होणं सोपं आहे, पालक होणं नाही अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी टिकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर सरकारला दोन दिवसांत निर्णय घ्यावाच लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.

कोरोनामुळे ऊसतोड कामगार ठिक ठिकाणी अडकले असून पंकजाताई मुंडे दररोज त्यांच्या संपर्कात राहून सरकारशी बोलत आहेत आणि त्यांना घरी पोचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज शिरोळ तालुक्यात वादळी वा-यासह मोठा पाऊस झाला, त्यात ऊसतोड मजूरांच्या सहाशे झोपड्या उडून गेल्या, अन्नधान्य पाण्यात भिजले. ही बातमी समजताच पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला, कामगारांच्या पत्नीशी बोलल्या, त्यांना व त्यांच्या लेकरांना सावरले, अशा परिस्थितीत मी राजकारण करत आहे, असं जर कोणी म्हणत असेल तर ते माणुसकीच्या पार कोसो दूर असतील यात शंका नाही , कामगार माझा जीव की प्राण आहे त्यांची काळजी मी शेवटच्या श्वासा पर्यंत घेईन असे त्या म्हणाल्या.

*सरकारला निर्णय घ्यावाच लागेल*

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर लवादाचे नेते जयंत पाटील व पंकजाताई मुंडे यांची आज चर्चा झाली. मागील काही दिवसांत त्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशीही बोलल्या. कामगारांना सुरक्षितपणे घरी पोचविण्यासाठी येत्या दोन दिवसांत सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.

Share this story