प्रवचनकार इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची अनिस ची मागणी

नगर दि 17 फेब्रुवारी/टीम सीएमन्यूज

अहमदनगर जिल्ह्यातील कीर्तनकार आणि प्रवचनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या विरुद्ध P.C.P.N.D.T. या कायद्यान्वये व तसेच भारतीय दंडविधान कायदा कलम १५३ (ब),५०४,
५०५ (२), ५०९ या कायद्यान्वये त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी बुवाबाजी संघर्ष विभाग, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती सचिव अॅड.रंजना पगार-गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक,अहमदनगर यांच्याकडे केली आहे .

यासंदर्भात त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन दिले असून त्यामध्ये इंदोरीकर महाराज यांनी कीर्तनामध्ये पुत्र प्राप्त होण्यासाठीचा संदेश दिला आहे.त्यामध्ये त्यांनी ‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशुभ वेळेला झाला तर औलाद रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी होतात.’ असे विधान केले आहे.
त्यापुढे जाऊन त्यांनी ‘टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब, असभ्य,बेजबाबदार,स्त्री दक्षिण्य भंग करणारी आणि कायदा व संविधान विरोधी वक्तव्ये आपल्या कीर्तनातून केली आहेत.

स्त्रियांना लज्जा आणणारे व स्त्रीत्वाचा अपमान करणारे वाक्य उच्चारून त्यांच्या कीर्तनातून ते स्त्रीद्वेष पसरवतात व स्त्री पुरुष भेदभाव करतात. स्त्रियांबद्दल वस्तूरूप व उपभोग्य वस्तू , गुलाम अशी भावना निर्माण करून समाजाचे संतुलन बिघडविण्याचे काम ते करत आहेत.त्यामुळे त्यांच्यावर P.C.P.N.D.T. या कायद्यान्वये व तसेच भारतीय दंडविधान कायदा कलम १५३ (ब),५०४, ५०५ (२), ५०९ या कायद्यान्वये त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे .

Share this story