बांधापर्यंत तंत्रज्ञानाचा प्रसार करा-डॉ. पी.जी. पाटील
बांधापर्यंत तंत्रज्ञानाचा प्रसार करा-डॉ. पी.जी. पाटील

राहुरी, दि.18 प्रतिनिधी

वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याची मागणी पूर्ण करण्यासाठी शेतीचे महत्व अधोरेखित झाले आहे.विद्यापीठाने विकसीत केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत प्रसारित झाल्यास शेतीची उत्पादनक्षमता वाढेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत काटेकोर सिंचनासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर या प्रशिक्षण वर्गाच्या ऑनलाईन समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली पुसाचे आंतरराष्ट्रीय जलव्यवस्थापन प्रमुख संशोधक डॉ. अशोक सिक्का उपस्थित होते.


या आधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, दापोलीचे डॉ. राजेश थोरात, प्रकल्पाचे प्रमुख संशोधक आणि प्रशिक्षणाचे निमंत्रक डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. सचिन डिंगरे तसेच विविध विभागाचे
विभाग प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील पुढे म्हणाले की, तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा या नेताजी सुभाषचंद्र यांच्या आवाहनाप्रमाणे आता तुम मुझे जल दो, मैं तुम्हे जीवन दूंगा असे म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावेळी डॉ. अशोक सिक्का म्हणाले की शेतीमध्ये पाणी हा महत्वाचा घटक असला तरी शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी पीक, माती, खत आणि पोषक व्यवस्थापनासह त्याचेे एकात्मीकरण तितकेच महत्वाचे आहे. देशात सिंचनाची कार्यक्षमता कमी आहे, म्हणुनच आपल्याला पाण्याचा वापर, त्याची उत्पादकता आणि क्षमता वाढविण्यासाठी विविध मार्ग अवलंबिण्याची गरज आहे. या प्रशिक्षणास सात राज्यांतून १५३ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या ऑनलाईन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंगल पाटील यांनी तर आभार डॉ. मुकुंद शिंदे यांनी मानले. या एकवीस दिवस प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी डॉ. सचिन डिंगरे, डॉ. प्रज्ञा जाधव व डॉ. मंगल पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.

Share this story