Pathardi-farmer sucide- *पाथर्डी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला धनंजय मुंडे करणार १ लाख रुपयांची मदत…*

 

मुंबई  दि.०२ फेब्रुवारी । टीम सीएमन्यूज

 

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील आत्महत्या केलेल्या मल्हारी बटुळे (वय ३१) या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना नाथ प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख रुपयांची मदत करणार असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले आहे.

जिल्हा परिषद शाळेतील एका कार्यक्रमात प्रशांत बटुळे या चिमुकल्याने शेतकरी आत्महत्या रोखण्याबाबत भावनिक कविता केली, त्याच रात्री त्याच मुलाच्या पित्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी या गावात घडली होती.

मल्हारी बटुळे यांचे धनंजय मुंडे यांच्यावर विशेष प्रेम होते. ना. मुंडे जेव्हा मंत्री झाल्यावर भगवानगडावर गेले तेव्हा मल्हारी यांनी भगवानगडाच्या प्रवेशद्वारावर १०१ नारळाचे तोरण बांधले होते, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

ही घटना कळताच ना. धनंजय मुंडे यांनी आपल्या या समर्थकाबाबत दुःख व्यक्त केले आहे. ‘मी मंत्री होऊन भगवानगडावर गेलो, तेव्हा माझ्या स्वागताला १०१ नारळाचे तोरण बांधणारा लढवय्या कार्यकर्ता आत्महत्येसारखे पाऊल उचलतो, याचे दुःख आणि आश्चर्य वाटले; कोणत्याही शेतकऱ्याने आपल्या कुटुंबाचा विचार न करता असे पाऊल उचलणे क्लेशदायक आहे.’ अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत धनंजय मुंडे यांनी आपल्या नाथ प्रतिष्ठान च्या वतीने मल्हारी यांच्या कुटुंबियांना प्राथमिक स्वरूपात १ लाख रुपयांची मदत देण्याचे घोषित केले आहे. तसेच बटुळे कुटुंबाची लवकरच भेट घेणार असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे.

Share this story