*शेतक-यांनाही शासनाने दिलासा देण्‍याचा विचार शासनाने गांभिर्याने करावा: माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील*
*शेतक-यांनाही शासनाने दिलासा देण्‍याचा विचार शासनाने गांभिर्याने करावा: माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील*

 

संगमनेर दि 7 जून ,टीम सीएमन्यूज

निसर्ग वादळाने पिकांबरोबरच पॉलिहाऊस आणि शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्‍याने शेतकरी हवालदिल झाला आहेत. पिंकाना नुकसान भरपाई देण्‍याचा निर्णय करताना शेडनेट आणि पॉलिहाऊस धारक शेतक-यांनाही शासनाने दिलासा देण्‍याचा विचार शासनाने गांभिर्याने करावा. यासाठी तहसिल आणि कृषि विभागाने वडगाव मावळचा पॅटर्न राबवून पंचनाम्‍यांचा वस्‍तुनिष्‍ठ अहवाल तयार करण्‍याची सुचना माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आधिका-यांना केली.

निमगावजाळी येथे मोठ्या संख्‍येने पॉलिहाऊस आणि शेडनेटच्‍या माध्‍यमातून तरुण शेतकरी शेती उत्‍पादन घेतात. निसर्ग वादळाच्‍या संकटामुळे या पॉलिहाऊस आणि शेडनेटचे संपुर्ण स्‍ट्रक्‍चरचेही नुकसान झाले आहे. यासाठी वापरण्यात येणारा कागदही वादळ आणि पावसाने फाटल्‍याने संपुर्ण शेडनेट आणि पॉलिहाऊस नव्‍याने उभे करण्‍याची वेळ शेतक-यांवर आली आहे. या शेतक-यांना आता पॉलिहाऊस आणि शेडनेटमध्‍ये उत्‍पादन घेणेही शक्‍य होणार नाही. बहुतांशी शेतक-यांनी बॅंकांची कर्ज काढुन हे पॉलिहाऊस आणि शेडनेट उभे केले आहेत. या नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत सापडलेल्‍या शेतक-यांना दिलासा देण्‍यासाठी आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी निमगावजाळी येथेच सर्व तरुण शेतक-यांशी शासकीय आधिका-यांसमवेत संवाद साधला आणि त्‍यांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या.

प्रारंभी उपविभागीय कृषि आधिकारी सुधाकर बोराळे यांनी नुकसान झालेल्‍या पॉलिहाऊस आणि शेडनेटच्‍या झालेल्‍या नुकसानीची माहीती दिली. तहसिलदार अमोल निकम यांनी नुकसानीचे पंचनामे सुरु असुन, मदतीबाबतचे अहवाल पाठविणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. बहुतांशी शेतक-यांनी पॉलिहाऊस, शेडनेटच्‍या झालेल्‍या नुकसानीमुळे बॅंकेकडुन घेतलेल्‍या कर्जाचा मोठा प्रश्‍न निर्माण होणार असल्‍याचे आ.विखे पाटील यांना सांगितले. नैसर्गिक आपत्‍ती नियमामध्‍ये पॉलिहाऊस आणि शेडनेटच्‍या नुकसानीस मदतीबाबतचा कोणताही उल्‍लेख नसल्‍याची बाब आधिका-यांनी आ.विखे पाटील यांच्‍या निदर्शनास आणुन दिली. याबाबत पावसाळी आधिवेशनात कृषिमंत्र्यांशी चर्चा करुन मदत करण्‍याबाबत आपण आग्रह धरु अशी ग्‍वाही आ.विखे पाटील यांनी दिली.

वडगाव मावळ तालुक्‍यात पॉलिहाऊस आणि शेडनेट मोठ्या प्रमाणात आहेत. वादळी वा-याने तिथेही मोठे नुकसान झाले आहे. तेथील प्रशासकीय यंत्रनेने या झालेल्‍या नुकसानीचे स्‍वतंत्र पंचनामे करुन अहवाल शासनास सादर केला आहे. त्‍याच धर्तीवर जिल्‍ह्यातही शेडनेट आणि पॉलिहाऊसच्‍या नुकसानीचे पंचनामे महसुल आणि कृषि विभागाने केले पाहीजेत अशी सुचना करुन आ.विखे पाटील म्‍हणाले की, झालेल्‍या नुकसानीच्‍या पंचनाम्‍याच्‍या प्रती संबधित शेतक-यांना दिल्‍या तर बॅंकांकडुन कर्ज घेतलेल्‍या शेतक-यांना सामोपचार कर्ज योजनेतून कर्ज फेडण्‍यास त्‍याची मदत होईल. ज्‍या बॅंकांकडुन पॉलिहाऊस आणि शेडनेटसाठी कर्ज घेतले त्‍या बॅंकांमधील आधिका-यांनी परवानगी न घेता आलेल्‍या शासकीय अनुदानाची रक्‍कम कर्जखात्‍यात वर्ग केल्‍याच्‍या तक्रारी आ.विखे पाटील यांच्‍याकडे शेतक-यांनी केल्‍या. याबाबत बॅंकींग समीतीचे प्रमुख म्‍हणुन जिल्‍हाधिका-यांशी आपण चर्चा करुन अशा तक्रारींची चौकशी करण्‍याची मागणी करणार असल्‍याचेही आ.विखे पाटील यांनी सांगितले. अनेक शेतक-यांनी पुर्वसंमती घेवून शेततळ्यांचे काम केले आहे. त्‍यांचे अनुदान शासनाकडुन अजुन प्राप्‍त होत नसल्‍याचे शेतक-यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्‍हा परिषद सदस्‍या अॅड.रोहीणी निघुते, माजी उपसभापती मच्छिंद्र थेटे, सरपंच अमोल जोंधळे, बाळासाहेब डेंगळे, किरण आरगडे, तालुका कृषि आधिकारी श्री.शेंडगे, पर्यवेक्षक प्रशांत वाकचौरे यांच्‍यासह तलाठी, मंडलाधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.

Share this story