मुंबई, दि. १४ –
वस्तीशाळा मधील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशाने शासनाने कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती केली होती. १ मार्च २०१४ च्या शासन निर्णयानुसार या शिक्षकांना शासन सेवेत सामावून घेण्यात आले. तथापि या शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत शासन स्तरावर चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
वस्तीशाळेवर शिकविणाऱ्या शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत आमदार सर्वश्री अभिमन्यू पवार आणि राहुल कुल यांनी विधिमंडळात उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने आज शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह वस्तीशाळेवरील शिक्षकांचे प्रतिनिधी, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव आबासाहेब कवळे, शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी, अवर सचिव विशाल परमार आदी यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री. भुसे म्हणाले, वस्तीशाळेवर शिकविणाऱ्या शिक्षकांनी समाजाप्रती उत्कृष्ट योगदान दिले आहे. तथापि या शिक्षकांची मूळ नियुक्ती कंत्राटी स्वरुपाची होती. या शिक्षकांना शासनाने परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू राहील, या अटीवर २०१४ मध्ये शासन सेवेत सामावून घेण्यात आले. तथापि या शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावयाची झाल्यास हा निर्णय केवळ वस्तीशाळेवरील शिक्षकांना नव्हे तर इतर विभागासाठी देखील लागू होईल. यासाठी शासनाला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल.