*मंदिरं, प्रार्थना स्थळं,चर्चेस उघडणं योग्य होणार नाही:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ*  
*मंदिरं, प्रार्थना स्थळं,चर्चेस उघडणं योग्य होणार नाही:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ*  

 

कोल्हापूर दि 28 प्रतिनिधी

राज्यात कोरोना बाधितांची संख्या सात लाखांवर तर मृतांची संख्या तेवीस हजारांवर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत मंदिरं, प्रार्थना स्थळं, चर्चेस उघडणं योग्य होणार नाही. म्हणून माझी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इम्तियाज जलील यांनी यासाठी आंदोलनं न करता  आमच्याबरोबर हातात हात घालून या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सहकार्य करावं,  असं आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केलं.

राज्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी भाजपनं आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. उलट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अलमट्टी धरणाची उंची कमी करण्यासाठी  कर्नाटक सरकारकडे प्रयत्न करावेत. यासाठी मी त्यांच्याबरोबर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना भेटावयास तयार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर सध्या बेडस् बरोबरच   ऑक्सिजनचीहि कमतरता भासू लागली आहे. त्याचप्रमाणे रेमडीसिवियर इंजेक्शन तसंच अन्य औषधं, यांचा तुटवडा ही जाणवत आहे. त्याच्या उपलब्धतेसाठी राज्य शासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. त्यासाठी लागणाऱ्या निधीची उपलब्धता व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती केली आहे. त्यासाठी लागणारा निधी कमी पडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Share this story