पुणे
हडपसर परिसरातील कामधेनू स्टेटसमधील उषा किरण हॉस्पिटल येथे गुरुवारी सायंकाळी बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. वेळेत माहिती मिळाल्याने मोठा अनर्थ टळला असून, घटनेनंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस), अग्निशमन दल तसेच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची नाकेबंदी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे सातच्या सुमारास रुग्णालयाच्या बाथरूममध्ये संशयास्पद वस्तू आढळली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ ही बाब डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित वस्तू रुग्णालयाबाहेर सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सक्रिय झाल्या. बीडीडीएस पथकाने संबंधित वस्तू ताब्यात घेत पुढील तपासासाठी मोकळ्या जागेकडे रवाना केले. दरम्यान, परिसरात घटनेची माहिती पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित अंतरावर हटवत परिसर बंदोबस्ताखाली घेतला.
या प्रकरणाचा तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही चित्रफितींची तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी पुणे पोलिसांची गुन्हे शाखा आणि दहशतवादविरोधी पथक (एटीएस) संयुक्तपणे तपास करत असल्याची माहिती दिली.