अहिल्यानगर
अधिकृत पदभार नसताना पदाचा गैरवापर करून बनावट दस्तावेज तयार करून चार शिक्षकांना नियुक्त्या दिल्याचा धक्कायदायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २०१३ ते १४ दरम्यान घडला. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यासह तिघांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला.
तत्कालीन शिक्षण अधिकारी सुलोचना पंढरीनाथ पटारे, वरिष्ठ सहाय्यक जे.के. वाघ (मयत), संस्थेचे सचिव रज्जाक अहमद शेख (मयत) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षण अधिकारी विलास अशोक साठे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे शिक्षण विभागात कार्यरत आहेत.
शिक्षण विभागातील नौदवही सापडत नव्हती. याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने शिर्डी येथील उर्दू एज्युकेशन सोसायटीतील चार शिक्षकांना बनावट कागदपत्रे देऊन नियुक्त्या दिल्या गेल्या आहेत, असा अहवाल दिला. त्यानुसार फसवणूक केल्याप्रकरणी पटारे यांच्यासह तिघांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.