बीड
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बातमी
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दैदीप्यमान आहे. त्यांच्या पुतळयाच्या बाबतीत जे घडले ते दुर्दैवी. चुक ती चुकच, त्याला माफी नाही. कोणी काम केलं, कोणाची चूक, ते महत्वाचं नाही, यावर कारवाई होणारच. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड येथे जनसन्मान यात्रेदरम्यान केले.
कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, मंत्री धनंजय मुंडे, माजी आ. अमरसिंह पंडीत, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, आ. विक्रम काळे, रुपाली चाकणकर, राजकिशोर मोदी, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, अशोक डक, जयसिंह सोळंके, रेखा फड यांच्यासह डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. सारिका क्षीरसागर यांची यावेळी उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे आगमन गुरुवारी बीड जिल्ह्यात झाले. बीडमध्ये अजित पवारांचे बाईक रॅलीने स्वागत झाल्यानंतर पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पवार म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दैदीप्यमान आहे. त्यांच्या पुतळ्याच्या बाबतीत जे घडले ते दुर्दैवी. चुक ती चुकच, त्याला माफी नाही. कोणी काम केलं, कोणाची चूक, ते महत्वाचं नाही, यावर कारवाई होणारच. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल असे पवारांनी सांगितले.
मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेत बीड जिल्हा राज्यात तीसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले. या सरकारने शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली. सामान्यांसाठी सरकारची तिजोरी खाली केली. त्यामुळेच येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्हयात राष्ट्रवादीचे चार तर महायुतीचे सहा आमदार असतील अशी ग्वाही दिली.
प्रास्ताविकात पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी एक वर्षाच्या कमी कालावधितही अजित पवारांच्या माध्यमातून सामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले. तसेच मराठा भवनासाठी निधी देण्यासह उर्दू घर, शेतकऱ्यांसाठी योजना, मोठया गावांमध्ये व्यायामशाळा, बीड शहरातील रस्ते आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.