राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्तांना वेतन व निवृत्तीवेतन २६ ऑगस्टलाच!
राज्य शासनाने यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी व निवृत्तांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी ऑगस्ट २०२५ महिन्याचे वेतन, निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्तीवेतन आगाऊ देण्यात येणार आहे. नेहमीप्रमाणे १ सप्टेंबर रोजी वेतन देण्याऐवजी यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजीच हे देयक अदा करण्यात येणार असल्याचे वित्त विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.
वित्त मंत्रालयातून प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार, राज्यातील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच निवृत्त व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना याचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र वित्त नियम १९६१ मधील तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित वेतन व निवृत्तीवेतनाची तरतूद तत्काळ करण्याचे आदेश संबंधित कोषागारे, लेखा व कोषालय कार्यालयांना देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे, कृषी विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालये, असाशकीय महाविद्यालयांतील अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्त अधिकारी-कर्मचारी व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही फायदा होणार आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी आर्थिक मदत मिळून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शासन निर्णयाची प्रत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.