prajakta mali press conference on suresh dhas अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्यात संघर्ष पेटला आहे. आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. आमदार सुरेश धस यांनी बीडमधील इव्हेंट पॉलिटिक्स असं म्हणत धनंजय मुंडेंवर टीका केली.
मात्र, त्यावेळी त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतल्यामुळे त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली. या सगळ्या प्रकरणावर आज मुंबईत प्राजक्ता माळीनं सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. सुरेश धसांच्या एका निराधार विधानामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याचं म्हणत त्यांनी जाहीर माफी मागायला हवी, अशी ठाम भूमिका प्राजक्ता माळीनं घेतली आहे.
“महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे शोभत नाही”
“कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांत जाणं, प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे. परळीच नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी काम केलं आहे. यापुढेही काम करत राहणार. याआधीही अनेक राजकीय नेत्यांबरोबर, मान्यवरांबरोबर फोटो आहेत. मग त्या फोटोचा संदर्भ घेऊन तुम्ही कुणाहीबरोबर असंच नाव जोडणार का? हे एक महिला कलाकार म्हणून मला अतिशय निंदनीय वाटतं.
महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. ते बोलले ते इतकं कुत्सित आहे. तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाही आहात. महिलांच्या कर्तृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. कुठल्या राजकारण्यांच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का? अशी टिप्पणी करून तुम्ही स्वत:ची मानसिकता दाखवत आहात”, अशा शब्दांत प्राजक्ता माळीनं आपला संताप पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
प्राजक्ता माळीनं केली महिला आयोगाकडे तक्रार
“फिल्म इंडस्ट्रीतल्या महिलांना फार सॉफ्ट टार्गेट केलं जातं. कुणीही यावं आणि नावं घेऊन जावं. तुम्ही तुमच्यातल्या राजकारणासाठी फिल्म क्षेत्रातल्या महिलांच्या नावांचा गैरवापर करणं बंद करावं अशी मी त्यांना विनंती करते. प्रसारमाध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी त्या टिप्पणीचा वापर केला. प्रसारमाध्यमांसमोर कसं बोलावं याचं त्यांना भान नाहीये. मी त्यांना विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं जाहीरपणे माझी मागावी.
फक्त माझीच नाही, ज्या महिलांचा त्यांनी चुकीचा उल्लेख केलाय, त्यांचीही त्यांनी माफी करावी. कोणत्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्रीतल्या महिलांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये. मी आज महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे. मी त्यांनाही विनंती केली आहे की तुम्ही यावर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी. मीही कायदेशीर कारवाई करत राहीन”, असं प्राजक्ता माळी म्हणाली.
prajakata mali “माझ्या आईला दीड महिना शांत झोप लागली नाही”
“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनाही मी विनंती करते. या व्यक्ती दोन वाक्य बोलून गेल्या. पण प्रसारमाध्यमं त्यातूनच हजार व्हिडीओ बनवतात. इतके वाईट मथळे देतात. समोरच्या माणसाच्या आयुष्यात तुमच्या या मथळ्यांमुळे वादळ येऊ शकतं, त्यांचं करीअर बरबाद होऊ शकतं, त्या नैराश्यात जाऊ शकतात. त्या आत्महत्या करू शकतात. माझी आई काल रात्रभर झोपली नाही. दीड महिना तिला शांत झोप लागली असेल असं मला वाटत नाही.
माझ्या भावानं सोशल मिडिया बंद केला. सगळे अकाऊंट्स डिलीट केले. या प्रकाराचा माझ्या कुटुंबावर वाईट परिणाम होतोय”, अशा उद्विग्न भावना प्राजक्ता माळीने यावेळी व्यक्त केल्या.
“समाजात फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या एका मुलीची प्रतिमा अशा प्रकारे डागाळणं आणि त्याला तोंड देणं अजिबात सोपी गोष्ट नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी याबाबत ठोस कारवाई करावी”, असंही तिने नमूद केलं.
“आमचं क्षेत्र बदनाम नाहीये, ही मंडळी ते बदनाम करतायत”
“जर हजार कार्यक्रमांत हजार माणसांबरोबर नावं जोडली गेली तर इथून पुढे कलाकार राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या कुठल्या कार्यक्रमाला जातील का? तेही धजावणार नाहीत. पुढे कुणी कला क्षेत्रात मुलांना पाठवणार नाहीत. कलाक्षेत्र बदनाम नाही. ही सगळी मंडळी ते बदनाम करतात.
आम्ही मनोरंजन करण्याचं काम करतो, पण तुम्ही आमची नावं मनोरंजनासाठी वापरता. स्वार्थासाठी वापरता. हे अत्यंत चुकीचं आहे. महिलांची नावं लगेच तोंडावर कशी येतात? पुरुषांची नावं कशी येत नाहीत?” असा सवालही प्राजक्ता माळीनं उपस्थित केला आहे.
काय म्हणाले होते सुरेश धस?
“विटभट्ट्या, जमीन बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला जात आहे. त्यातून इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना इथे आणले जाते”, असं विधान त्यांनी केलं होतं. तसेच, “जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे”, असंही ते म्हणाले होते.