Thursday, November 13, 2025
Homeप्रादेशिक बातमी‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

सोमवारपासून राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात;

मुंबई,

पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर सर्व विभागांत सोमवार दि. 16 जून रोजी तर विदर्भात सोमवार दि. 23 जून 2025 पासून होणार आहे. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

शाळेची गुणवत्ता वृद्धींगत करण्यासाठी व मुलांची उपस्थिती वाढविण्याकरीता शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभर ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, राज्यमंत्री तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांना नजिकच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये भेट देण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत शालेय गणवेश व इतर सोयी सुविधांचा आढावा घेण्यात येईल. तसेच शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक यांच्याशी चर्चा करुन विद्यार्थ्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत प्रवेश घेण्याकडे कल कसा वाढेल, यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यात येतील.

मुख्य सचिवांकडून आढावा

   राज्यातील लोकप्रतिनिधींबरोबरच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी शाळांना भेट द्यावी याबाबत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नुकताच आढावा घेतला. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हा स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी यांनी शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करावे.

 त्याचबरोबर शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी उपाययोजना सूचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.  

   विद्यार्थ्यांमध्ये संख्याज्ञान व कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपूण महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत दुसरी ते पाचवीच्या वर्गातील किमान 75 टक्के विद्यार्थ्यांना इयत्तेनुसार अध्ययन क्षमता प्राप्त करणे हे ध्येय आहे. 

या कार्यक्रमांतर्गत पालकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळण्याकरिता शासनाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांनी ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमामध्ये पालकांशी हितगुज साधावे. तसेच सर्व अधिकाऱ्यांना दत्तक शाळा घेण्याबाबत जबाबदारी देण्यात आली आहे, त्यानुसार सचिवांनी देखील पुढाकार घेऊन राज्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सहकार्य करावे, अशी विनंती शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन यांनी केली आहे.

   शाळेस भेट देत असताना शाळेतील भौतिक सुविधांचा दर्जा, विद्यार्थ्यांच्या खेळांच्या सुविधांचा दर्जा, शाळेतील पूरक व्यवस्था, शालेय व्यवस्थेचा दर्जा, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी, प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेंतर्गत देण्यात येणारा पोषण आहार आदी विविध विषयांबद्दल मान्यवरांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. 

या भेटीमुळे समाज, पालक, विद्यार्थी, शिक्षक यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होण्याबरोबरच बालकांना आत्मविश्वासपूर्वक व्यक्त होण्याची तसेच दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास श्रीमती कुंदन यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments