Homeजिल्हा बातमीटंचाई असलेल्या ठिकाणचे टँकर प्रस्ताव तातडीने पाठवा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

टंचाई असलेल्या ठिकाणचे टँकर प्रस्ताव तातडीने पाठवा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

अहिल्यानगर,

water crisis in ahilyanagar पाणीटंचाईचा काळ सुरू झाल्याने टँकरसाठी कोणाच्या शिफारशीची वाट न पाहता, ज्या ठिकाणी टंचाई आहे त्या ठिकाणचे टँकर प्रस्ताव तातडीने पंचायत समिती व तालुका महसूल प्रशासनाकडे सादर करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.

​पाथर्डी येथील तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील पाणीटंचाईची आढावा बैठक पार पडली. त्याप्रसंगी डॉ. आशिया बोलत होते.
​यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, शेवगावचे प्रभारी तहसीलदार निलेश वाघमारे, शेवगावच्या गटविकास अधिकारी सोनल शहा, नायब तहसीलदार किशोर सानप, रवींद्र शेकटकर, मुख्याधिकारी संतोष लांडगे, सहायक कृषी अधिकारी वैभव थोरे तसेच तालुक्यातील सर्व विभागप्रमुख, तलाठी व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.

​जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, प्रांताधिकाऱ्यांना टँकर मंजुरीचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. दिलेल्या पिण्याच्या पाण्याची तपासणी आरोग्य विभागाने दररोज करावी व यासाठी कर्मचारी नियुक्त करावेत. ग्रामसेवक व तलाठी यांनी याबाबत सतर्क राहावे.

​दोन्ही तालुक्यांत ज्या ठिकाणी पाणीसाठा आहे, तेथे वीजपंपाची अनधिकृत वीजजोडणी तत्काळ खंडित करण्याचे निर्देश वीज वितरण कंपनीला देण्यात आले. पाण्याचा अनधिकृत उपसा होणार नाही याची जबाबदारी वीज वितरण कंपनी, जलसंधारण विभागाचे अधिकारी व संबंधित संस्थांनी घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिले.

​पशुधनासाठी लागणाऱ्या चाऱ्याचे आणि पाण्याचे नियोजन करण्यात आले असून, टंचाईकाळात व त्यानंतरही पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी सर्व विभागांनी दक्षता घ्यावी.

तलावातील पाणीउपसा तत्काळ बंद करावा, अन्यथा संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. टँकर भरतानाचे आणि रिकामा करतानाचे फोटो आवश्यक असून, तपासणीवेळी हे फोटो सादर करणे बंधनकारक राहील. नियमांचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल. टंचाईकाळात सर्वांनी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिल्या.

​बैठकीच्या प्रास्ताविकात तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी माहिती दिली, तर प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी आभार मानले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या हस्ते मंडळ अधिकारी व तलाठ्यांना लॅपटॉप व इतर साहित्याचे वितरणही करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments