Homeजिल्हा बातमी​minister chhagan bhujbal jamkhed news महापुरुषांच्या विचारांचा संगम म्हणजे समताधिष्ठित समाजरचना -...

​minister chhagan bhujbal jamkhed news महापुरुषांच्या विचारांचा संगम म्हणजे समताधिष्ठित समाजरचना – मंत्री छगन भुजबळ

​अहिल्यानगर, दि. १७ :

minister chhagan bhujbal jamkhed news छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना रुजवून जनतेला स्वाभिमान दिला. महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील विषमता दूर करण्यासाठी आयुष्य वेचले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेद्वारे समानता, स्वातंत्र्य व बंधुता या मूल्यांची भक्कम पायाभरणी केली. या तिन्ही महापुरुषांच्या विचारांचा संगम म्हणजे समताधिष्ठित समाजरचना असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

​जामखेड येथे आयोजित शिव-फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात मंत्री श्री. भुजबळ बोलत होते. कार्यक्रमास विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
​यावेळी आमदार काशिनाथ दाते, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार भीमराव धोंडे, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, संध्या सोनवणे, गायक उत्कर्ष शिंदे आदी उपस्थित होते.

​मंत्री छगन भुजबळ म्हणाले , छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अत्यंत उत्तुंग आणि प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यक्रांती घडवून आणत सर्व जाती-धर्मातील मावळ्यांना एकत्र करून सुराज्याची मुहूर्तमेढ रोवली. शेतकऱ्यांना आधार देत न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी राज्यकारभार केला. अन्यायाविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजक्रांती घडवून शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील विषमता दूर करण्यासाठी आयुष्य वेचले. बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुली करून सामाजिक परिवर्तनाचा पाया रचला. त्यांच्या द्विशताब्दी वर्षाचे औचित्य साधून संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

​डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यात ३२ पदव्या प्राप्त करून ज्ञानाची उंची गाठली. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून समाजातील दीन, दलित आणि शोषित घटकांच्या हक्कांचे संरक्षण करत प्रत्येक नागरिकाला समान अधिकार बहाल केले. मतदानाचा अधिकार देत लोकशाही अधिक मजबूत केली आणि देशाला विकासाच्या दिशेने नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. आपला महाराष्ट्र हा याच महापुरुषांच्या विचारांवर आधारित असून सर्वांना एकत्र घेऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

​नव्या पिढीने महापुरुषांच्या विचारांचा अभ्यास करून समाज परिवर्तनात सक्रिय सहभाग घ्यावा – सभापती प्रा. राम शिंदे

​सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुशासन, महात्मा फुले यांचे शिक्षणविस्ताराचे कार्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक न्यायाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच मार्गदर्शक आहे. नव्या पिढीने या महान विचारांचा अभ्यास करून समाज परिवर्तनात सक्रिय सहभाग घ्यावा. अशा उत्सवांमधून सकारात्मक आणि प्रेरणादायी विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचत असल्याचे ते म्हणाले.

​यावेळी आमदार काशिनाथ दाते, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संध्या सोनवणे यांनी केले.
​या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

​कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेसही पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments